प्रतिनिधी/ वास्को
मुरगाव तालुक्यात मांगोरहिल पाठोपाठ आता झुआरीनगरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. यामध्ये झुआरी ऍग्रो कंपनीत काम करणाऱया मजुरांचा भरणा अधिक असून 98 कामगार कोविड सेवा केंद्राअभावी घरीच आहेत. तेथे नागरिकांचे स्वॅब घेणे चालूच आहे. बायणा भागातही अधिक संख्येने कोरोना रुग्ण आढळू लागले आहेत.
गत महिन्यात सर्वप्रथम झुआरी कंपनीतील कंत्राटी कामगारांमध्ये कोरोनाबाधित आढळले होते. त्यामुळे कंपनीनेच आपल्या आवारात कामगारांचे स्वॅब गोळा करण्यासाठी स्वतंत्र केंद्र सुरू केले होते. आजघडीस या कंपनीतील 98 कामगारांना कोरोना झाल्याचे आढळून आलेले आहे. झुआरी कंपनीतील बहुतेक कंत्राटी कामगार झोपडपट्टी तसेच झुआरीनगर परिसरात राहतात. ही झोपडपट्टी सध्या कंटेनमेंट झोनमध्ये आहे. तेथील बाधितांची संख्या शुक्रवारी संध्याकाळपर्यंत 192 होती. शनिवारी संध्याकाळी कुठ्ठीळी प्राथमिक आरोग्य केंद्रात 365 बाधितांची नोंद झाली असून यातील अर्धेअधिक झुआरीनगरातील आहेत. या वस्तीतील नागरिकांचे स्वॅब घेणे चालूच असल्याने ही संख्या वाढत जाण्याची भीती आहे.
संसर्ग वाढण्याचा धोका
झुआरी कंपनीतील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या 98 कामगारांसमोर सध्या वेगळीच समस्या उभी राहिलेली आहे. या कामगारांना दाखल करून घेण्यास चिखलीच्या उपजिल्हा हॉस्पिटलात जागेचा अभाव आहे. तसेच त्यांना मडगाव कोविड सेवा केंद्र किंवा हॉस्पिटलमध्येही दाखल करण्यात आलेले नाही. त्यामुळे हे कामगार सध्या घरीच असून त्यांची संख्या प्रचंड असल्याने संसर्ग वाढण्याचा धोका आहे. कुठ्ठाळी मतदारसंघातही बाधितांची संख्या वाढत असल्याने तेथे स्वतंत्र सेवा केंद्र उघडण्यात यावे अशी मागणी झुआरीतील कामगारांचे एक नेते ओलान्सीयो सिमोईस यांनी केली आहे.
बायणातही बाधितांच्या संख्येत वाढ
दरम्यान, वास्कोतील बायणा भागातही कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत बायणातील बाधितांची संख्या 138 झाली होती. नवेवाडेतील संख्या 112 झाली होती. वास्को खारवीवाडा भागातील बाधितांची संख्या 104 तर हेडलॅण्ड सडय़ावरील संख्या 100 झाली होती.