महिला एकेरीच्या अंतिम लढतीत रशियाच्या ऍनास्तेशिया पावल्युचेन्कोव्हावर मात, दुहेरीतही जेतेपदाचे लक्ष्य
पॅरिस / वृत्तसंस्था
झेक प्रजासत्ताकच्या बिगरमानांकित बार्बरा क्रेसिकोव्हा फ़्रेंच टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेत महिला एकेरीतील सम्राज्ञी ठरली. तिने शनिवारी सायंकाळी रंगलेल्या अंतिम लढतीत रशियाच्या ऍनास्तासिया पावल्युचेन्कोव्हाला 6-1, 2-6, 6-4 अशा सेटस्मध्ये पराभूत केले. दुसरा सेट गमवावा लागला असला तरी तिसऱया सेटमध्ये 38 मिनिटात बाजी मारत तिने जेतेपद काबीज केले.
25 वर्षीय क्रेसिकोव्हासाठी ही केवळ पाचवी महत्त्वाची स्पर्धा असून रोलँड गॅरोसवर मागील 5 वर्षात जेतेपद संपादन करणारी ती तिसरी बिगरमानांकित खेळाडू ठरली. क्रेसिकोव्हा आता एकाच वर्षात फ़्रेंच ओपनमध्ये एकेरी व दुहेरीचे विजेतेपद मिळवण्याचा प्रयत्न करेल. यापूर्वी 2000 साली मेरी पियर्सने असा पराक्रम गाजवला होता. क्रेसिकोव्हा दुहेरीत कॅटेरिया सिनियाकोव्हासह आज दुहेरीच्या फायनलमध्ये खेळणार आहे.
31 वी मानांकित पावल्युचेन्कोव्हाने आजवर 52 स्पर्धा खेळल्या असून येथे ती प्रथमच एखाद्या ग्रँडस्लॅम फायनलमध्ये खेळत होती. शनिवारी अंतिम लढतीत दुसऱया सेटदरम्यान तिला डाव्या पायावर उपचार करुन घ्यावे लागले. क्रेसिकोव्हासाठी हे केवळ दुसरेच डब्ल्यूटीए जेतेपद आहे. मागील महिन्यात तिने स्ट्रसबर्ग, फ्रान्स येथे क्ले कोर्टवर पहिले जेतेपद मिळवले होते. येथे जेतेपद मिळवत तिने सलग 12 वा विजय नोंदवला आहे.
यंदा अनेक मानांकित खेळाडूंना एक तरी माघार घ्यावी लागली किंवा पराभवाला सामोरे जावे लागले. यामुळे, पहिले तीन मानांकित खेळाडू उपांत्य फेरीपर्यंतही पोहोचू शकले नाहीत. जपानच्या द्वितीय मानांकित नाओमी ओसाकाने केवळ एकाच लढतीनंतर माघार घेतली तर 2019 मधील विजेती अव्वलमानांकित ऍश बार्टीने दुसऱया फेरीतील लढतीत दुखापतीचा त्रास जाणवल्याने माघार घेतली. 2018 मधील विजेती सिमोना हॅलेपला देखील येथे दुखापतीचा फटका बसला तर सेरेना विल्यम्सला चौथ्या फेरीत पराभवाचा धक्का सोसावा लागला.