साईराज साळुंखे मालिकावीर, ओंकार चौगुले सामनावीर
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
उत्कृष्ट फलंदाजी व अचूक गोलंदाजीच्या जोरावर झेवर गॅलरी डायमंड संघाने बीएसपी टायगर्स संघाचा 14 धावांनी पराभव करून निमंत्रितांचा पहिला विजेता चषक पटकाविला. एक्स्ट्रीमच्या साईराज साळुंखेला मालिकावीर, श्रेया चव्हाणला उत्कृष्ट फलंदाज, बाळाराम कोलकारला उत्कृष्ट गोलंदाज व ओंकार चौगुलेला सामनावीराचा चषक देऊन गौरविण्यात आले.
युनियन जिमखाना मैदानावर आयोजित विजेता चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात झेवर गॅलरी डायमंड संघाने 25 षटकात 8 बाद 110 धावा केल्या. सुरेंद्र पाटीलने 23, ओंकार चौगुलेने 19, अभिनव शर्माने 17 धावा केल्या. बीएसपी टायगर्सतर्फे नवीन बेकवाडकर, बाळाराम कोलकार व सोहम चव्हाण यांनी प्रत्येकी 2 तर जयशांत सुब्रम्हण्यम व विराज माळवी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना बीएसपी टायगर्स संघाला 25 षटकात 9 बाद 96 धावांपर्यंत मजल मारता आली. जयशांत सुब्रम्हण्यमने 30, सुमित भोसलेने 15, तर विराज माळवीने 11 धावा केल्या. झेवर गॅलरीतर्फे सन्मुख एस. व ओंकार चौगुले यांनी प्रत्येकी 2 तर महंमद हमजा व सुरेंद्र पाटील यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
बक्षीस वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून स्पर्धा पुरस्कर्ते चंद्रकांत कडोलकर, निलेश देसाई, नागरत्न हिरेमठ, समीर सलामवाले, सलमान गोकाककर, किरण बेनकट्टी, अजय सुनगार, प्रशांत पुत्रण, झहुर अहमद सराफ, स्पर्धा सचिव परशराम पाटील, सचिन साळुंखे व भाग्यश्री देसाई आदी उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते अंतिम सामन्यातील सामनावीर ओंकार चौगुले, इम्पॅक्ट खेळाडू जयशांत सुब्रम्हण्यम, उत्कृष्ट झेल हर्ष नाशीपुडी, सर्वाधिक चौकार सुरेंद्र पाटील यांना चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज श्रेया चव्हाण (हनी डॉट), उत्कृष्ट गोलंदाज बाळाराम कोलकार (बीएसपी), छाप पाडणारा खेळाडू जयशांत सुब्रम्हण्यम (बीएसपी), उत्कृष्ट यष्टीरक्षक सुमित भोसले (बीएसपी), स्पर्धेतील प्रॉमिसिंग खेळाडू महंमद हमजा (झेवर गॅलरी), उगवता क्रिकेटपटू आरूष पुत्रण (बीएसपी) तर सर्व संघातील इम्पॅक्ट खेळाडू श्रेया पोटे, आरव नलवडे, स्वरूप साळुंखे, नवीन बेकवाडकर व ओंकार चौगुले यांना चषक, प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
विजेत्या झेवर गॅलरी व उपविजेत्या बीएसपी टायगर्स संघांना आकर्षक चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. अंतिम सामन्यासाठी पंच म्हणून राजू बडवाण्णाचे व विशाल तुक्कार, स्कोअरर म्हणून गणेश यांनी काम पाहिले तर स्पर्धेचे समालोचन प्रमोद जपे यांनी केले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिमखाना मैदानाचे ग्राऊंड्समन अनिल गवी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन मिलिंद चव्हाण यांनी केले.