केआर शेट्टी स्मृती चषक टी-20 स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
केआर शेट्टी स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित दुसऱया केआर शेट्टी स्मृती चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत रविवारी उद्घाटना दिवशी झेवर गॅलरी डायमंड संघाने केआर शेट्टी किंग्स संघाचा 5 गडय़ांनी पराभव करून विजयी सलामी दिली. कर्णधार माजीद मकानदार (झेवर गॅलरी) याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना मैदानावर या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सुमित छाब्रिया, प्रणय शेट्टी, वासीम धामणेकर, परशराम पाटील, पुणीत शेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते. सुमित छाब्रिया यांनी यष्टीपूजनाने स्पर्धेचे उद्घाटन केले. पहिला सामना साईराज वॉरियर्स व विश्रुत स्ट्रायकर्स यांच्यात होता. पण शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे सकाळी खेळपट्टी ओली असल्याने पंचांनी 12 पर्यंत खेळपट्टीची पाहणी करून तो सामना रद्द केला. दुसऱया सामन्यात झेवर गॅलरी डायमंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्विकारली. प्रथम फलंदाजी करताना केआर शेट्टी संघाने 18 षटकात 8 बाद 132 धावा केल्या. वैभव कुरूबागीने 1 षटकार 3 चौकारासह 39, प्रणय शेट्टीने 3 चौकारासह 24, रब्बानी दफेदारने 2 षटकार 1 चौकारासह 18 धावा केल्या. झेवर गॅलरी डायमंडतर्फे आकाश पत्तारने 32 धावात 3, आनंद कुंभारने 7 धावात 2, रोहित पाटीलने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना झेवर गॅलरी डायमंड संघाने 17.1 षटकात 5 बाद 134 धावा करून सामना 5 गडय़ांनी जिंकला. माजीद मकानदारने 2 षटकार 3 चौकारासह 31 चेंडूत 48, चेतन पांगिरेने 1 षटकार 2 चौकारासह 25 तर नागेंद्र पाटीलने 1 षटकार 1 चौकारासह 16 धावा केल्या. केआर शेट्टीतर्फे रब्बानी दफेदारने 25 धावात 3, वैभव कुरूबागी व डॉमनिक फर्नांडिस यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे ऋतुराज चौगुले, इंद्रजीत पाटील, चेतन अक्काली, अमर सरदेसाई व प्रणय शेट्टी यांच्या हस्ते सामनावीर माजीद मकानदार, इम्पॅक्ट खेळाडू वैभव कुरूबागी, उत्कृष्ट झेल स्वयम अप्पण्णावर, सर्वाधिक षटकार रब्बानी दफेदार यांना चषक देवून गौरविण्यात आले.
सोमवारचे सामने -1) रायजींग स्टार वि. विश्रुत स्ट्रायकर्स, सकाळी 9.30 वा. 2) अर्जुन स्पोर्ट्स हुबळी टायगर्स वि. साई स्पोर्ट्स, दुपारी 1.30 वा.