काही दिवसांपूर्वी, हॉरर- कॉमेडी या जॉनरचा झोंबिवली या मराठी चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले होते आणि त्या ऑफिशिअल पोस्टरमुळे सर्वत्र सिनेमाची चर्चा रंगली. आपल्या मराठीत झोंबी पाहायला नक्कीच सर्वांना आवडेल आणि त्यांना पाहण्यासाठी उत्सुकता देखील वाढली असेल. आता प्रेक्षकांना झोंबीची छोटीशी झलक पाहायला मिळणार आहे कारण झोंबिवली चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. आतापर्यंत प्रेक्षकांनी हिंदी आणि इंग्रजी सिनेमात झोंबीज् पाहिले आहेत, पण झोंबिवलीच्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठीमध्ये पण आता झोंबीज् पाहायला मिळणार आहेत.
मोशन पोस्टर हे सिनेमाप्रती उत्सुकता वाढवणारे आहे. झोंबींचे व्हिज्युअल, सुप्रसिध्द संगीतकार ए.व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी दिलेले पार्श्वसंगीत, एकंदरीत मोशन पोस्टरचा इफेक्ट या सर्व गोष्टींमुळे या चित्रपटाबद्दल अधिक उत्सुकता आहे. सारेगम प्रस्तुत झोंबिवली चित्रपटाची निर्मिती युडली फिल्म्स यांनी केली आहे. तर सुप्रसिध्द सिनेदिग्दर्शक आदित्य सरपोतदार दिग्दर्शित या चित्रपटात अमेय वाघ, ललित प्रभाकर आणि वैदेही परशुरामी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 2021 ला प्रदर्शित होणार आहे.