आयपीओतून 9 हजार 375 कोटी उभारणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गेल्या कित्येक दिवसांपासून फूड डिलिव्हरी क्षेत्रातील कंपनी झोमॅटोच्या आयपीओबाबत चर्चा रंगली होती. पण आयपीओ कधी येणार याबाबत स्पष्टता करण्यात येत नव्हती. अखेर कंपनीने आपला आयपीओ येत्या 14 जुलै रोजी भारतीय भांडवली बाजारात दाखल करण्याचे निश्चित केलेले आहे. गेल्या महिन्या दोन महिन्यापासून झोमॅटोच्या बहुचर्चित आयपीओबाबत चर्चा होत होती. फूड डिलिव्हरी क्षेत्रात अग्रेसर असणाऱया झोमॅटोचा आयपीओ भारतीय बाजारात सादरीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
9 हजार 375 कोटीचा आयपीओ
सदरच्या आयपीओच्या माध्यमातून झोमॅटो 9 हजार 375 कोटी रुपये उभारणार असल्याचे समजते. कंपनीचा आयपीओ 14 जुलैला खुला होणार असून 16 जुलैला बंद होणार आहे. 72-76 प्रति समभाग प्राइस बँड असणार आहे. बाजारातील नियामक सेबीने मागच्या आठवडय़ात झोमॅटोच्या आयपीओ सादरीकरणाच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला होता. कंपनीच्या गुंतवणूकदारांमध्ये इन्फोएज, सेक्वोइया, अँट फायनॅन्शीयल्स आणि उबर यांचा समावेश आहे. आयपीओतील 65 लाख इक्वीटी समभाग कंपनीच्या कर्मचाऱयांसाठी राखीव ठेवलेले असल्याचे कंपनीने म्हटले आहे.