फळे भाज्या करणार घरपोच
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोविड 19 च्या दरम्यान ग्राहकांना विविध प्रकारची सुविधा मिळण्यात मोठय़ा अडचणी निर्माण होत असल्याचे चित्र आजही पहावयास मिळत आहे. याच पावर्श्वभूमीवर उद्योग क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात बदल होत आहेत. यात आता ऑनलाईन अन्नाचा पुरवठा करणारी झोमॅटो कंपनी आपली सेवा विस्तारीत करण्यासाठी सहकार क्षेत्रातील कंपनी मदर डेअरीसोबत हात मिळवणी करणार आहे. या भागीदारीमधून येत्या काळात ग्राहकांना फळे, भाज्यासह अन्य वस्तूंची घरपोच सेवा देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
दिल्ली आणि एनसीआरमध्ये ताजी फळे आणि भाज्या ग्राहकांना उपलब्ध करुन देणारी सहकारी क्षेत्रातील कंपनी मदर डेअरीची फळे व भाज्यांची शाखा असणाऱया विक्री केंद्रांची मदत घेऊन हे काम सुरु करण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
या अगोदर एफएमसीजी क्षेत्रातील प्रमुख कंपनी आयटीसीनेही अशीच योजना आखली आहे. त्यांनी सुपरमार्ट क्षेत्रातील विशाल मेगा मार्टसोबत भागीदारी केली आहे. अशा प्रकारे भागीदारीतून कंपन्या आपला व्यवसाय विस्तारीत करण्याचे काम करत असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.
प्रारंभ 11 केंद्रावरुन
आता झोमॅटोचे डीलीवरी बॉय 11 केंद्रांच्या मदतीने सुरुवातीला आपली सेवा देणार आहेत. सदरचे केंद्र हे 10 किलोमीटरच्या अंतरावर एक असणार आहे. सध्या दिल्ली आणि एनसीआर येथे 300 पेक्षा अधिकची फळ व भाजी विक्री केंद्रे आहेत. ग्राहकांना झोमॅटोच्या आधारे आवश्यक ती ऑर्डर करावी लागणार आहे.