आयपीओला प्रतिसाद कायम : किरकोळ गुंतवणूकदारांच्या बोली
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
झोमॅटोचा इनिशियल पब्लिक ऑफर (आयपीओ) 14 जुलै रोजी खुला झाला आहे. पहिल्या दिवशी गुंतवणूकदारांनी समाधानकारक प्रतिसाद दिल्यानंतर दुसऱया दिवशी 15 जुलै रोजीही जवळपास 1.3 पटीने झोमॅटोच्या आयपीओला प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती आहे. यामध्ये किरकोळ गुंतवणूकदारांनी समभागांसाठी बोली लावल्या असल्याची माहिती आहे.
शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार सादर करण्यात आलेल्या 71.92 कोटी समभागांच्या आयपीओच्या तुलनेत 95.44 कोटी इक्विटी समभागांसाठी बोली प्राप्त झाली आहे. किरकोळ गुंतवणूकदारांनी आपल्या आरक्षित हिस्सेदारीच्या तुलनेत 3.96 पटीने बोली लावल्या आहेत. किरकोळ व्यक्तिगत गुंतवणूकदारांसाठी आरक्षित 12.95 कोटी समभागाच्या तुलनेत दुपारी दोन वाजेपर्यंत 51.36 कोटी समभागांची बोली लावण्यात आली असल्याची माहिती शेअर बाजारात देण्यात आली आहे. देशातला हा सर्वात मोठा आयपीओ ठरणार आहे.
आज आयपीओ होणार बंद
चालू वर्षातील सर्वात मोठा आयपीओ म्हणून झोमॅटोच्या आयपीओला ओळखले जाते. हा आयपीओ बुधवारी 14 जुलै रोजी खुला झाला असून शुक्रवारी 16 जुलै रोजी बंद होणार आहे. आयपीओसाठी मूल्यदर हा 72 ते 76 रुपये प्रतिसमभाग ठेवण्यात आला आहे.