एकाच ठिकाणच्या अतिक्रमण हटवण्यावर भर, मोती चौक ते 501 पाटी मार्गावर कारवाई जुना आरटीओ भागात टपऱया पुन्हा बोकाळल्या
प्रतिनिधी / सातारा
मोती चौक ते 501 पाटी या मार्गाच्या दुतर्फा बसलेल्या किरकोळ विक्रेत्यांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करत रस्ता मोकळा केला आहे. मात्र याच मार्गावरील अतिक्रमणावर कारवाईचा बडगा उगारून सदरबझार परिसरात आरटीओ कार्यालयाला टपरीधारकांनी विळखा घतला आहे. त्याकडे मात्र वाहतूक पोलीस कधी लक्ष देणार ? असा सवाल उपस्थित होत आहे.
अनलॉकच्या पार्श्वभूमीवर पुन्हा किरकोळ विक्रेत्यांनी शहरात अतिक्रमण केले आहे. वाहतूकीस अडथळा होवू नये म्हणून ग्रेड सेपरेटरही सुरू झाला. तरीही मोती चौक मार्ग कर्मवीर पथावर येताना वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या किरकोळ विक्रेत्यांकडे पालिकेने दुर्लक्ष केले आहे. मात्र यांना हटवण्याचे काम वाहतूक पोलिसांनी हातात घेतल्याने गुरूवारी त्यांच्यावर कारवाई ही करण्यात आली. या करवाईची धास्ती इतर विक्रेत्यांनीही घेतल्याने दोन दिवसांपासून रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे.
याच पार्श्वभूमीवर शहरातील एसटी स्टॅड, राधिका रोड, सदर बाझार, जुनाआरटीओ या भागात बंद टपऱया व विक्रेत्यांचे अतिक्रमण बोकाळले आहे. जुना आरटीओ कार्यालयाला चालू बंद टपऱयांच्या विळख्याने वेगळे रूप आले आहे. येथे येणारे ग्राहक रस्त्यालगत वाहने उभी करतात. यामुळे इतर वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. या टपऱयाच्या आडून अनेक अवैध कामे केली जातात. तरीही याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केला आहे. यामुळे या टपरीधारकांचा मनमानी कारभार वाढला आहे.
नेत्याची नावे पुढे…
जुना आरटीओ परिसरातील विक्रेत्यावर पालिकेने अनेक वेळा कारवाई केली. मात्र येथील विक्रेते पालिकेच्या कर्मचाऱयांना नेत्यांच्या नावाने दम भरतात. यामुळे कारवाई लवकर थंड होतात. असे काही विक्रेत्याकडून सांगण्यात येते. या विक्रेत्यांवर नेते मेहरबान असल्याने यांचा फायदा घेत टपऱयांच्या रांगा लागलेल्या पहायला मिळत आहेत.