‘बेस्ट आउटऑफ वेस्ट’ थिअरी प्रत्यक्षात साकार करून संगीत जगताला स्वतःच्या अजोड कलाकृतींद्वारे हुगळीचे सोमनाथ बंडोपाध्याय प्रकाशमान करत आहेत. ते टाकाऊ सामग्रीपासून अजोड सांगितिक वाद्यं निर्माण करत आहेत.
सोमनाथ यांचे वडिल नीरद बरन बंडोपाध्याय यांना संगीत आणि कला जगतातील देश तसेच विदेशात विख्यात पंडित रविशंकर, अकबर अली आणि बांगला ऑर्केस्टा जगतातील दिग्गज कलाकार तिमिर भट्टाचार्य यांचे सान्निध्य प्राप्त झाले होते. याचमुळे सोमनाथ यांच्यात संगीताचा हा वारसा वडिलांकडून चालत आला आहे.
हुगळीच्या श्रीरामपूर येथील सोमनाथ यांच्या घरात टाकाऊ सामग्रीपासून तयार करण्यात आलेली विविध प्रकारची वाद्यं दिसून येतात. लहानपणापासून आतापर्यंत कधीच बाजारातून सांगितिक वाद्य खरेदी केलेले नाही, त्याऐवजी स्वतःच्या हातांनी तयार करण्यात आलेल्या वाद्यांना वाजवून सरस्वती मातेची आराधना केल्याचे सोमनाथ सांगतात.
मी तयार केलेली सांगितिक वाद्यं ही काही प्रसिद्ध उपकरणे नसतात, दैनंदिन गरजा पूर्ण झाल्यावर फेकून दिल्या जाणाऱया सामग्रीपासून संगीताचा अमिट सूर छेडणाऱया वाद्याची निर्मिती करतो असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी तयार केलेली वाद्ये दिग्गज कंपन्या आणि ब्रँडच्या म्युझिकल इन्स्ट्रुमेंटच्या तोडीस तोड आहेत.
सोमनाथ यांनी तुटलेल्या टाइल्सपासून सेरेमिक टाइल्स तरंग, खिडकीच्या तुटलेच्या काचेपासून काच तरंग, शीतपेय आणि सॉसच्या बाटल्यापासून तरंग, तानपुरा, गिटार, वीणा समवेत अनेक वाद्यांची निर्मिती केली आहे.