मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला विश्वास
प्रतिनिधी/ पणजी
टाटा सन्ससारख्या उद्योग समूहाने गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविणे ही गोव्यासाठी मोठी अभिमानाची व आनंदाची गोष्ट असून त्यांचे सहकार्य आणि गुंतवणुकीमुळे भविष्यात गोव्यात रोजगाराच्या मोठय़ा संधी उपलब्ध होतील, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.
गोवा राज्याला संपूर्ण देशाच्या विकासाशी जुळवून घेण्यासाठी टाटा सन्स समूहाच्या अधिकाऱयांसोबत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.
टाटाला सर्वतोपरी सहकार्य
पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी गोव्यात उद्योग विकास आणि रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता असल्याचे सांगितले. टाटा सारखा समूह गोव्यात गुंतवणूक करत असेल तर सरकारतर्फे सर्व प्रकारचे सहकार्य देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
या बैठकीस मुख्यमंत्र्यांसोबत उद्योगमंत्री माविन गुदिन्हो, मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल, टाटा सन्स समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन, नोएल टाटा यांच्यासह कंपनीचे अन्य वरिष्ठ मुख्य कार्यकारी अधिकारी यांची उपस्थिती होती.
उद्योग विषयांवर चर्चा
या महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात गोवा लघु उद्योग संघटनेने महत्त्वाची भूमिका बजावली. या संवादादरम्यान गोव्यातील गुंतवणुकीला चालना देणे, एमएसएमई विकासाला चालना देण्यासाठी बडय़ा उद्योगांना आमंत्रित करणे आदी अनेक विषयांवर बोलणी करण्यात आली. आयटी, एव्हिएशन मॅन्युफॅक्चरिंग, रिटेल, हॉस्पिटॅलिटी, सॉफ्ट स्किल्ससाठी टेनिंग सेंटर यासारख्या सर्व क्षेत्रातील संधींवर भर देण्यात आला.
चंद्रशेखरन यांनी मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांच्या रोजगार निर्मितीच्या सर्वांगीण दृष्टिकोणाची प्रशंसा केली. गोव्यासाठी नवीन पिढीच्या व्यवसायांना चालना देण्यासाठी त्यांच्या वरिष्ठ मुख्य कार्यकारी अधिकाऱयांसोबत तातडीने विशेष बैठकीचे आयोजन करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.