पायलट पद्धतीने होणार लाँचिंग – डिजिटल व्यवसाय करणार मजबूत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय ई-मार्केटमध्ये नवीन ऍप लवकरच सादर करण्यात येणार असल्याची माहिती आहे. यामध्ये देशातील सर्वात विश्वासपूर्ण उद्योगाची परंपरा असणाऱया टाटा समूहाकडून चालू वर्षातील सप्टेंबरमध्ये आपल्या डिजिटल व्यवसायाला चालना देण्यासाठी सुपरऍपचे पायलट पद्धतीनुसार सादरीकरण करणार असल्याचे संकेत आहेत.
कंपनीने या अगोदर विदेशी फंडात गुंतवणूकदारांच्या मदतीने जवळपास 14.83 ते 18.53 हजार कोटी रुपयांचा निधी उभारण्याची तयारी केली असल्याचे पहावयास मिळत आहे. ऍपचे सादरीकरण आणि विदेशातील गुंतवणूक याचा आधार घेत टाटा डिजिटल प्लॅटफार्मला पूर्णपणे मजबुती प्राप्त करण्यावर भर देणार असल्याचे संकेत असून टाटाची टक्कर ऍमेझॉन, फ्लिपकार्ट आणि रिलायन्स समूहाच्या जिओमार्टसोबत राहिली आहे.
विदेशी गुंतवणूकदारांसोबत चर्चा
टाटासन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी मे महिन्यात अमेरिकेचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी तेथील गुंतवणूकदारांशी चर्चा केली आहे. यामुळे येत्या काळात भारतामधील टाटाचा ऑनलाईन व्यवसाय वृद्धींगत करण्यास या चर्चेचा लाभ होणार असल्याचे चंद्रशेखरन यांनी स्पष्ट केले आहे. ऍपमध्ये सर्व प्रकारच्या ऑनलाईन व्यापाराच्या सेवा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.