वृत्तसंस्था/ पुणे
भारताचा अव्वल टेनिसपटू प्रजनेश गुणनेश्वरण हा आगामी टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेतील एकेरीच्या मुख्य ड्रॉ मध्ये स्थान मिळविणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस टेनिस संघटना (एमएसएलटीए) व महाराष्ट्र शासन यांच्या वतीने आयोजित ही स्पर्धा पुण्यातील म्हाळुंगे, बालेवाडी स्टेडीयम येथे 3 ते 9 फेब्रुवारी दरम्यान रंगणार आहे.
पोलंडच्या कॅमिल मॅकक्रेझाक याने माघार घेतल्यामुळे प्रजनेशला ही सुवर्णसंधी मिळाली. विश्वक्रमवारीत 123 व्या स्थानावर असलेला प्रजनेश सध्या सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सहभागी झाला होता. ही त्याची पाचवी ग्रँड स्लॅम स्पर्धा होती. टाटा ओपनच्या मुख्य स्पर्धेत स्थान मिळविण्यासाठी पर्यायी खेळाडूंच्या यादीत जपानच्या गो सोएडा याच्या पाठोपाठ प्रजनेश दुसऱया स्थानावर होता. पण गो सोएडा यानेही अखेरच्या क्षणी माघार घेतल्यामुळे प्रजनेशला मुख्य ड्रॉ मध्ये थेट प्रवेश मिळविता आला.
टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेचे संचालक प्रशांत सुतार म्हणाले की, प्रजणेशच्या प्रवेशामुळे एकेरीच्या मुख्य ड्रॉ मध्ये भारताचे आव्हान दिसून येणार आहे. आशियातील या एकमेव एटीपी स्पर्धेत भारतीय खेळाडूचा सहभाग असणे ही खूपच महत्वाची गोष्ट आहे. कारण या स्पर्धेच्या माध्यमातून भारतीय खेळाडूंना अधिकाधिक फायदा व्हावा, ही स्पर्धा आयोजनामागचा हेतू आहे.