पुणे / प्रतिनिधी
टाटा ओपन स्पर्धेच्या तिसऱया पर्वात भारताच्या साकेत मानेनी आणि अर्जुन कडे यांनादेखील एकेरीसाठी वाईल्ड कार्ड प्रवेश देण्यात आला असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
क्रीडा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेचे सचिव सुंदर अय्यर आणि टाटा ओपन टेनिस स्पर्धेचे संचालक प्रशांत सुतार उपस्थित होते.
हर्डीकर म्हणाले, दक्षिण अशियात होणारी ही एटीपी मालिकेतील एकमेव स्पर्धा आहे. या स्पर्धेच्या संयोजन समितीचे प्रमुख सदस्य आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज स्पर्धेचा मुख्य ड्रॉ जाहीर केला. यात सिंगल क्वालिफाईनमध्ये साकेत मानेनी, अर्नेस्ट गुलपिस्ट, डबल्समध्ये रोहन बोपण्णा, अर्जुन कडे आणि सिंगल पुरूषांमध्ये अर्जुन कडे, शशीकुमार मुकुल यांना वाईल्ड कार्ड मिळाले आहे.
म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर 3 ते 9 फेब्रुवारीदरम्यान या स्पर्धा पार पडणार आहेत. या स्पर्धेत एकूण 546,355 अमेरिकन डॉलरची रोख पारितोषिके देण्यात येणार आहे. स्पर्धेच्या इतिहासातील ही सर्वाधिक पारितोषिकाची रक्कम आहे. 1 ते 2 फेब्रुवारीत स्पर्धेतील पात्रता लढती खेळविण्यात येतील. विविध 12 देशातील एकूण 19 टेनिसपटूंना मुख्य फेरीत थेट प्रवेश देण्यात आला आहे. तीन खेळाडूंना वाईल्ड कार्ड प्रवेश देण्यात आला असून, दोन खेळाडूंना खास कोटय़ातून प्रवेश देण्यात आला आहे. चार टेनिसपटू पात्रता फेरीतून मुख्य फेरीत येतील. 9 फेब्रुवारीला स्पर्धेचा समारोपला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत, असे हर्डीकर यांनी नमूद केले.
सुंदर अय्यर म्हणाले, स्पर्धेत यंदाच्या वर्षीपासून आम्ही शॉट क्लॉक ही संकल्पना राबविणार आहोत. दोन गुणांच्यामध्ये या पद्धतीने 25 सेकंद मोजली जाणार आहेत. याचा वापर सर्वप्रथम 2007 मध्ये एटीपी फायनल्स स्पर्धेत त्यानंतर 2018 मध्ये अमेरिकन टेनिस स्पर्धेतदेखील करण्यात आला होता.