ऑनलाईन टीम / मुंबई :
शिक्षण आणि रोजगारक्षमता यांच्यातील अंतर मिटवले जावे आणि ऊर्जा व इतर पूरक क्षेत्रांना नोकरीसाठी आवश्यक कौशल्यांसह सज्ज व्यावसायिक उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने टाटा पॉवरच्या स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटने (टीपीएसडीआय) ६९७०० हून अधिक व्यक्तींना रोजगाराभिमुख प्रशिक्षण दिले आहे. या प्रशिक्षणामध्ये प्रत्यक्ष साधनांचा वापर करण्याच्या अनुभवांवर सर्वाधिक भर देण्यात आला आहे.
टीपीएसडीआयने २०१५ साली भारतातील वंचित वर्गातील आणि शारीरिक मेहनतीचे काम करणाऱ्या व्यक्तींसाठी कौशल्य विकास कार्यक्रमाने सुरुवात केली. त्यानंतरच्या वर्षांमध्ये आपल्या प्रशिक्षण सुविधांचा वेगाने विस्तार करत टीपीएसडीआयने आजवर आपल्या पाच प्रशिक्षण केंद्रांमध्ये ३४०० पेक्षा जास्त अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे. आज टीपीएसडीआयमध्ये इतर कॉर्पोरेट क्षेत्रातील अभियंते आणि कर्मचाऱ्यांना देखील प्रशिक्षण दिले जाते. त्याचबरोबरीने या संस्थेने आंतरराष्ट्रीय स्तरावर इथिओपिया आणि लायबेरिया या देशांमध्ये देखील उच्च कौशल्यांचे प्रशिक्षण दिले आहे.
टीपीएसडीआयचे चीफ जयवदन मिस्त्री म्हणाले, आम्ही नेहमीच असे मानत आलो आहोत की यशस्वी होण्यासाठी व्यावसायिकांनी उद्योगक्षेत्राला आवश्यक असलेली कौशल्ये विकसित करून आपल्या रोजगार क्षमता वाढवणे गरजेचे असते. सुरुवात झाल्यापासून केवळ चार वर्षात म्हणजे गेल्या वर्षी ६९००० प्रशिक्षित उमेदवारांचा टप्पा आम्ही पार केला. अतिशय सोप्या, सहज, बाजारपेठेच्या आवश्यकतेनुसार आणि रोजगारभिमुख प्रशिक्षण कार्यक्रमांमुळेच हे यश मिळू शकले, ज्यांनी अनेकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणले. भविष्यात असे इतर अनेक टप्पे आम्ही पार करत राहू आणि भारतातील ऊर्जा क्षेत्रासाठी कुशल कर्मचारी लक्षणीय प्रमाणात उपलब्ध करवून देत राहू.