मुंबई
टाटा मोटर्सची नवी टाटा सफारी ही कार येत्या 26 जानेवारीला बाजारात दाखल होणार आहे. या गाडीचे उत्पादन कंपनीच्या पुणे येथील कारखान्यात घेण्यात आले आहे. सदरची गाडी ऑटो एक्स्पो 2020 मध्ये प्रदर्शित करण्यात आली होती. त्यानंतर ग्राहक या गाडीची उत्सुकतेने वाट पाहात होते.
टाटा सफारी 6 व 7 जण बसतील अशा सोयीसह येणार आहे. या गाडीची किंमत 15 ते 21 लाखाच्या घरात असणार असल्याचे सांगण्यात येते. सदरच्या गाडीत 2 लिटर चार सिलेंडर टर्बो चार्जड डिझेल इंजिन असणार आहे. नवी टाटा सफारी 6 स्पीड मॅन्युअल किंवा ऑटोमेटिक ट्रान्समिशन प्रकारात उपलब्ध होणार असून ऑल विल ड्राईव्ह किंवा फोर व्हिल ड्राईव्ह नसेल. सुरूवातीला डिझेलवर चालणारी सफारी आणली जाणार असून नंतरच्या कालावधीत ही गाडी पेट्रोल इंधनावरही सादर केली जाणार आहे. गाडीत 18 इंच अलॉय व्हिल्स, हरमन म्युझिक सिस्टीम, 10 इंच टच स्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीम असणार आहे. तसेच ऍश वुड डॅशबोर्ड, वायरलेस चार्जिंग, पॉवर्ड ड्राइव्हर सीट अशा सुविधाही यात असतील. सुरक्षिततेसाठी म्हणून गाडीत 6 एयरबॅग्ज असतील.