ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
बाईटडान्सने आपली टिकटॉक कंपनी अमेरिकेत विकण्यासाठी ओरॅकलची निवड केली आहे. टिकटॉक विकत घेण्यासाठी मायक्रोसॉफ्ट आणि ओरॅकल मैदानात होते. बाईटडान्सने त्यामधील ओरॅकलची निवड केल्याचे वृत्त एका संकेतस्थळाने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
हेरगिरीच्या चिंतेवरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत चीनच्या मालकीच्या टिकटॉकवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी टिकटॉकला 20 सप्टेंबर अंतिम तारीख दिली आहे. तसेेच त्यासाठी पर्याय म्हणून टिकटॉकने आपला व्यवसाय अमेरिकन कंपनीला विकण्यास सांगितले होते.
टिकटॉक खरेदी करण्यास अमेरिकेतील मायक्रोसॉफ्ट आणि ओरॅकल रेसमध्ये होती. टिकटॉकची मालकी असलेल्या बाईटडान्सने मायक्रोसॉफ्ट या टेक कंपनीची ऑफर नाकारली आहे. मात्र, या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.