ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘टिकटॉक’ या चिनी कंपनीला 90 दिवसात अमेरिकेतील संपत्ती विकण्याचे आदेश दिले आहेत.
अमेरिकेने मागील आठवड्यात टिकटॉक आणि वी-चॅट या चीनच्या लोकप्रिय ॲपवर बंदी घातली होती. हे दोन्ही ॲप देशाची राष्ट्रीय सुरक्षा, परदेश धोरण आणि अर्थव्यवस्थेला घातक असल्याचे त्यावेळी ट्रम्प यांनी म्हटले होते. आता ट्रम्प यांनी टिकटॉकला दणका देत टिकटॉकची मालकी असलेल्या बाईट डान्स या चिनी कंपनीला अमेरिकेतून गाशा गुंडाळण्यासाठी 90 दिवसांचा अवधी दिला आहे.
बाईट डान्स या कंपनीच्या मागे चिनी गुप्तचर संस्था कार्यरत आहे, असा ट्रम्प यांना विश्वास आहे. बाईट डान्सविरोधात अमेरिकेकडे भक्कम पुरावे आहेत. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेसाठी अमेरिकेने हे पाऊल उचलल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. बाईट डान्स या कंपनीच्या कर्मचार्यांनी ट्रम्प यांच्या आदेशाला न्यायालयात आव्हान दिले आहे.