बेतोडा-बोरी बगलमार्गावरील घटना
प्रतिनिधी /फोंडा
बेतोडा-बोरी बगलरस्त्यावर गणेशनगर-बोंडबाग येथे टिप्पर ट्रक व कारगाडीची समोरासमोर धडक होऊन कारमधील चौघेजण जखमी झाले. काल मंगळवारी सकाळी 10 वा. सुमारास हा अपघात झाला. जखमींपैकी सर्व चारहीजण हैद्राबाद येथील असून त्यात दोघा महिलांचा समावेश आहे. त्यांना उपचारासाठी बांबोळी येथील गोमेकॉत दाखल करण्यात आले होते. अंजूम (25), जसिम (25), चंदना भारत (27) व प्रवीण कुमार (26) अशी जखमींची नावे आहेत. तिघांना जास्त दुखापत झाली आहे. फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हैद्राबाद येथील हे चारही प्रवासी एपी 21 बीके 1827 या क्रमांकाच्या कारगाडीतून कुर्टी बेतोडामार्गे बोरीच्या दिशेने मडगावकडे निघाले होते. बायताखोल बोरी सर्कलपासून अलीकडे गणेशनगर बोंडबाग येथे पोचले असता, कारचालकाने समोरील वाहनाला ओव्हटेक करण्याचा प्रयत्न केला. याचवेळी समोरुन येणाऱया जीए 08 व्ही 5077 या क्रमांकाच्या टिप्पर ट्रकला कारगाडीची जोरदार धडक बसली. त्यात कारगाडीच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला व चालकासह आंतमधील चारहीजण जखमी झाले. कारला धडकल्यानंतर टिप्पर ट्रक रस्त्याच्या बाजुला असलेला झाडीत घुसला. घटनेची माहिती मिळताच फोंडा अग्नीशामक दलाचे पथक व फोंडा पोलीस घटनास्थळी धावले. जखमींना प्रथम फोंडा उपजिल्हा इस्पितळात व नंतर गोमेकॉत दाखल करण्यात आले.