ड्रोनमधून शस्त्रपुरवठा -अमृतसरमध्ये हल्ल्याचा कट फसला, पाकिस्तानच्या कुरापती उघड
अमृतसर / वृत्तसंस्था
पंजाबमधील अमृतसरमध्ये ड्रोनच्या सहाय्याने पाकिस्तानकडून मोठय़ा प्रमाणावर शस्त्र पाठवल्याचे उघड झाले आहे. हा शस्त्रसाठा ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे पंजाब पोलिसांनी जप्त केला आहे. या घटनेच्या माध्यमातून सीमारेषेवर अद्यापही पाकिस्तानच्या कुरापती सुरूच असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सीमेपलीकडून सात पिशव्यांमध्ये आयईडी टिफीन बॉम्ब, पाच हॅण्डग्रेनेड आणि 9 एमएम पिस्तूलची जवळपास 100 काडतूस पाठवली गेली आहेत.
आतापर्यंत जम्मू काश्मीरमध्ये ड्रोनच्या सहाय्याने शस्त्रपुरवठा केला जात असल्याचे प्रकार उघड झाले होते. त्यापाठोपाठ आता घुसखोरांना शस्त्र पुरवण्यासाठी पंजाब सीमेवर पाकिस्तानकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. अशाच प्रकारची पाकिस्तानची कुरापत उघड झाली आहे. अमृतसरजवळ एका गावात 7-8 ऑगस्ट रोजी रात्री ड्रोन दिसले होते. याशिवाय तेथील ग्रामस्थांनी काही वस्तू पडल्याचा आवाजदेखील ऐकला होता. त्यानंतर काही संशयित वस्तू आढळल्याची देखील माहिती मिळाली आणि जेव्हा तपासणी केली गेली, तेव्हा सात पिशव्यांमध्ये आयईडी, हॅण्डग्रेनेड आणि काडतूस असल्याचे दिसून आले. याबाबत आता राष्ट्रीय तपास यंत्रणेलाही माहिती देण्यात आली आहे.
जम्मू काश्मीर भागात कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांना सीमेपलीकडून आता एके-47 ऐवजी चिनी पिस्तुलांचा पुरवठा केला जात असल्याचे उघड झाले आहे. दहशतवाद्यांना शस्त्रपुरवठा करणाऱया संघटनांनी त्यांच्या रणनितीमध्ये हा बदल केला असल्याचे दिसून आले आहे. पूर्वी प्रामुख्याने एके-47 रायफल्सचा वापर दहशतवादी सर्रास करत होते. मात्र आता चिनी पिस्तुलांचाही वापर वाढला आहे. सीमापार येणाऱया ड्रोनमधून अशी पिस्तुले येत आहेत.