दोन्ही जोडय़ांचे सलग दुसरे जेतेपद
वृत्तसंस्था/ पॅरिस
टिमीया बॅबोस व क्रिस्टिना म्लाडेनोविक यांनी फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत महिला दुहेरीचे सलग दुसऱयांदा जेतेपद पटकावले. या जोडीने एकत्र खेळताना मिळविलेले हे चौथे ग्रँडस्लॅम अजिंक्यपद आहे. पुरुष दुहेरीत केविन क्रॅवीट्झ व आंदेयास माएस यांनीही पुन्हा एकदा जेतेपद स्वतःकडेच राखले आहे.
हंगेरीची बॅबोस व फ्रान्सची म्लाडेनोविक यांना अमेरिकन ओपनमधून कोव्हिड 19 नियमावलीमुळे माघार घ्यावी लागली होती. त्यांनी आता महिला दुहेरीची गेल्या 11 पैकी चार ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे पटकावली आहेत. येथे झालेल्या अंतिम फेरीत बॅबोस-क्रिस्टिना यांनी डेसिरे क्रॅवझिक व ऍलेक्सा ग्वाराची यांच्यावर 6-4, 7-5 अशी मात केली. अमेरिकन स्पर्धेत बॅबोस-क्रिस्टिना जोडीला दुसऱया फेरीच्या सामन्याआधी माघार घेणे भाग पडले होते. फ्रान्सच्या बेनोई पेअरला कोरोनाची लागण झाल्याचे त्यावेळी उघड झाले होते आणि क्रिस्टिनाने त्याच्यासमवेत पत्ते खेळले असल्याने तिला क्वारंटाईनमध्ये राहणे भाग पडले होते. त्यामुळे या जोडीलाच स्पर्धेबाहेर पडावे लागले होते. क्रिस्टिनाच्या नावावर आता महिला दुहेरीची पाच अजिंक्यपदे नोंद झाली असून त्यात फ्रान्सच्याच कॅरोलिन गार्सियासमवेत मिळविलेलया पेंच ओपन जेतेपदाचाही समावेश आहे. बॅबोसने आतापर्यंतची सर्व ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे क्रिस्टिनासमवेतच मिळविलेली आहेत.
पुरुष दुहेरीत केविन क्रॅवीट्झ व आंदेयास माएस या जर्मनीच्या जोडीने जेतेपद स्वतःकडेच राखताना अंतिम फेरीत क्रोएशियाचा मेट पॅव्हिक व ब्राझीलचा ब्रुनो सोआरेस यांच्यावर 6-3, 7-5 अशी मात केली. मागील वर्षी ही स्पर्धा जिंकून त्यांनी असा पराक्रम करणारी जर्मनीची पहिली जोडी होण्याचा मान मिळविला होता. त्याचीच पुनरावृत्ती त्यांनी येथे केली आहे. त्यांना या स्पर्धेत आठवे मानांकन मिळाले होते तर पराभूत जोडी ही अमेरिकन ओपन चॅम्पियन आहे. ही स्पर्धा सलग दोनदा जिंकणारी केविन-आंद्रेयास ही एकूण चौथी जोडी आहे.