दोघा जणांना अटक, तीन तरुणींची सुटका, सीईएन विभागाची कारवाई
प्रतिनिधी / बेळगाव
काँग्रेस रोड, टिळकवाडी येथे युनिसेक्स स्पा मसाज सेंटरच्या नावाने अनैतिक धंदा थाटणाऱ्या दोघा जणांना शनिवारी अटक करण्यात आली आहे. सीईएन विभागाच्या अधिकाऱयांनी मसाज सेंटरवर छापा टाकुन ही कारवाई केली असून या कारवाईत तीन तरुणींची सुटका करण्यात आली आहे.
सीईएनचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी एका पत्रकाव्दारे ही माहिती दिली असून काँग्रेस रोड, टिळकवाडी येथील नेल्सन हाईटस् अपार्टमेंटमधील न्यु गेट वे युनिसेक्स स्पा मसाज सेंटरवर छापा टाकण्यात आला आहे.
प्रकाश कन्नाप्पा येळ्ळूरकर (वय 27, रा. मराठा कॉलनी, टिळकवाडी), विनायक केदारी शिंदे (वय 37, रा. मरगाई गल्ली, जुने बेळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत. पोलीस आयुक्तांनी कारवाई करणाऱया पथकाला बक्षीस जाहीर केले आहे.
मसाज सेंटरच्या नावाने अनैतिक कृत्ये चालत असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱयांनी मसाज सेंटरवर छापा टाकला. यावेळी तीन तरुणी या सेंटरवर होत्या. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेवून त्यांची सुटका केली आहे. महिला सुधारगृहात त्यांची रवानगी करण्यात आली आहे.
स्पा चालकांनी परवानगी घेणे सक्तीचे
या कारवाईनंतर युनिसेक्स स्पावर पोलिसांची नजर पडली आहे. बेळगाव शहर व उपनगरांतील स्पा चालकांनी परवानगी घेणे सक्तीचे असून स्पामध्ये सीसीटीव्हीचे कॅमेरे बसविणे गरजेचे आहे. याबरोबरच तेथे काम करणाऱया कर्मचाऱयांची माहिती आपल्या जवळ ठेवण्याची गरज आहे. कोणत्याही परिस्थितीत स्पामध्ये अनैतिक कृत्ये सुरू असल्याचे दिसून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनी दिला आहे.