क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
आयएसएल फुटबॉल स्पर्धेत आज वास्कोतील टिळक मैदानावर हैदराबाद एफसीची लढत केरळ ब्लास्टर्स संघाशी होणार आहे. बहुतांश मोसमात हैदराबाद एफसीचा संघ चौथ्या स्थानावर होता, पण आता त्यांचे तीन सामने शिल्लक असताना पाचवे स्थान आहे. चौथ्या स्थानावरील एफसी गोवा संघाइतकेच त्यांचे 24 गुण आहेत, तर नॉर्थईस्ट युनायटेडपेक्षा ते दोन गुणांनी मागे आहेत.
हैदराबाद एफसीला कामगिरीत आणखी घसरण परवडणार नाही. गेल्या सात सामन्यांत त्यांना सहा वेळा बरोबरी साधावी लागली आहे. आता आणखी गुण गमवावे लागल्यास बाद फेरीच्या त्यांच्या आशांना मोठा धक्का बसेल याची त्यांना जाणीव आहे. कागदावर तुलना केल्यास स्पर्धेतील सर्वांत ढिसाळ संघाविरूद्ध त्यांची लढत आहे, पण हा संघ थोडी प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळेल. केरळ ब्लास्टर्सला 29 गोल पत्करावे लागले असून या बाबतीत त्यांचा शेवटून दुसरा क्रमांक आहे. त्यांचा बचाव इतका कमकुवत आहे की प्रशिक्षक किबू व्हिकूना यांच्या संघाला पहिला गोल केल्यानंतरही 18 गुण गमवावे लागले आहेत. यामुळे त्यांना कमी लेखण्यास हैदराबाद एफसीचे प्रशिक्षक मान्यूएल मार्क्वेझ यांनी नकार दिला.
आम्ही ब्लास्टर्सविरूद्ध आमच्या शैलीचा खेळ करू. जिंकायची गरज आहे म्हणून आम्ही बदल करणार नाही. आम्ही नऊ सामन्यांत अपराजित असलो तरी त्यात सहा बरोबरी आहेत. आम्हाला लय कायम राखावी लागेल आणि जिंकण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण आमच्यासाठी हा मोसम चमकदार ठरला आहे. आम्हाला पहिल्या चार संघांमध्ये स्थान मिळवायचे आहे, असे मार्क्वेझ म्हणाले.
या दोन संघांमध्ये अखेरच्या क्षणापर्यंत चुरशीचा खेळ अपेक्षित आहे. ब्लास्टर्सचे 22 पैकी 14 गोल दुसऱया सत्रात झाले आहेत, तर हैदराबाद एफसीने मध्यंतरानंतर 16 गोल केले आहेत. दोन्ही संघाची बचावफळी दुसऱया सत्रात सक्षम ठरलेली नाही. ब्लास्टर्सला या कालावधीत 18 गोल पत्करावे लागले आहेत, जे प्रमाण सर्वाधिक आहे. हैदराबादविरूद्ध 17 पैकी 11 गोल दुसऱया सत्रात झाले आहेत. व्हिकुना यांना सर्वाधिक सुधारणा अपेक्षित आहे ती संधीचे रूपांतर गोलमध्ये करण्यात. आमच्या आघाडी आणि बचावफळीत संतुलनाचा अभाव आहे. बहुतांश सामन्यांत आम्ही प्रतिस्पर्ध्यापेक्षा जास्त संधी निर्माण केली, पण आम्हाला गुण मिळविता आलेले नाहीत. या बाबतीत आम्हाला सुधारणा करावी लागेल. आम्ही सराव करीत असून चुकांचे परिक्षण करीत आहोत. निर्माण केलेल्या संधी आणि झालेले गोल यांतील सरासरीत सकारात्मक सुधारणा होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे व्हिकुना म्हणाले.