आईवडिलांसोबत गरजूंपर्यंत पोहोचवतेय जेवण
कोरोना महामारीमुळे गरीबांना रोजगार गमवावा लागला आहे. आर्थिक संकटामुळे ते त्रस्त झाले आहेत. या अवघड काळात अनेक कलाकार गरजूंना मदत करत आहेत. अभिनेत्री टिस्का चोप्रा देखील गरजूंना धान्य पुरवून चर्चेत आली आहे.
अभिनेत्रीने स्वतःच्या आईवडिलांसोबत मिळून गरजूंना मदत केली आहे. टिस्काने महामारीने प्रभावित विधवा महिला आणि ट्रान्सजेंडर्सच्या मदतीसाठी शेफ विकास खन्नासोबत हातमिळवणी केली आहे. टिस्काने गरजूंना स्वतःच्या परीने मदत करण्यास सुरुवात केली आहे.
याचदरम्यान टिस्काला ‘व्हॉट्सअप विद मी’ या पुस्तकाकरता सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. हे पुस्तक तारुण्य आणि मासिक धर्म यासारख्या विषयांवर भूमिका मांडणारे आहे. हे पुस्तक मुलींना त्यांच्या जीवनाच्या अवघड काळात वाटचाल करण्यासाठी सहाय्यभूत ठरेल अशी अपेक्षा आहे. लेखन, चित्रपटनिर्मिती आणि अभिनयाचा आनंद घेतला असल्याचे टिस्काने म्हटले आहे.