दुचाकी अन् रुग्णवाहिकेला मिळाली अनुमती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीच्या टिकरी सीमेवर मार्ग मोकळा करण्यावर शेतकरी सहमत झाले आहेत. सध्या तेथून दुचाकी अन् रुग्णवाहिकेसाठी मार्ग खुला करण्यात आला आहे. पण यापूर्वी शेतकरी मार्ग खुला न करण्यावर अडून बसले होते. शनिवारी सकाळी तणावपूर्ण स्थिती होती, त्यानंतर दिल्ली पोलिसांसोबत शेतकऱयांची बैठक झाली, ज्यात कुठलीच सहमती होऊ शकली नव्हती.
या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाच्या टिकरी बॉर्डर समितीने स्वतःची बैठक घेतली आणि त्यानंतर उद्योजकांनीही स्वतःची बाजू मांडली आहे. या घडामोडींनंतर शेतकरी सीमेवर दुचाकी अन् रुग्णवाहिकेसाठी मार्ग खुला करण्यावर सहमत झाले. दिल्ली पोलिसांसोबतच्या चर्चेत सहमती दर्शविण्यात आल्यावर मार्ग खुला करण्यात आला. रस्ता सकाळी खुला केला जावा आणि रात्री बंद करण्यात यावी अशी अट शेतकऱयांनी घातली आहे. पण रुग्णवाहिकेला रात्री गरज भासल्यास मार्ग कसा मोकळा करणार यावर सहमती होऊ शकलेली नाही.
टीकरी सीमेवर 5 फुटांपेक्षा अधिक मार्ग मोकळा करण्यापासून आंदोलकांनी रोखले आहे. कार आणि अवजड वाहनांना मार्ग न देण्यावर आंदोलक शेतकरी ठाम आहेत. तर दिल्ली आणि हरियाणा पोलिसांनी वेगवेगळी मते मांडली आहेत. दिल्ली पोलीस टीकरी सीमेवरून केवळ दिल्लीतून येणारी वाहतूक सुरू करण्यास तयार आहेत. तेथून दिल्लीत प्रवेशाबद्दल ते सहमत नाहीत. तर हरियाणा पोलिसांनी दोन्ही बाजूची वाहतूक सुरू करण्यावर जोर दिला आहे. सधय दोन्ही राज्यांचे पोलीस या सीमेवरून कारसाठीही मार्ग खुला करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. टीकरी सीमेवरील मार्ग खुला करण्याबाबत आमचे मत दोन्ही राज्यांच्या पोलिसांपेक्षा वेगळ आहे. कारसाठी मार्ग खुला केल्यास येथे प्रतिदिन दुर्घटना होतील. 6 नोव्हेंबर रोजी संयुक्त मोर्चाची सिंघू सीमेवर बैठक होणार असल्याची माहिती शेतकरी आंदोलनाचे नेते बूटा सिंह यांनी दिली आहे.