कंगना रनौतने अवनीत कौर आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांना दर्शविणारा फर्स्ट लुक शेअर केला आहे. कंगनाचा आगामी चित्रपट टीकू वेड्स शेरु या चित्रपटाचा हा फर्स्ट लुक आहे. चित्रपटाचे चित्रिकरण सोमवारपासून सुरू झाले आहे. चित्रपटात नवाज हा शिराज खान अफगाणी उर्फ शेरूची व्यक्तिरेखा साकारत आहे. कंगनाने तीन पोस्टर्स शेअर केले आहेत. तिसऱया पोस्टरमध्ये नवाजुद्दीन आणि अवनीत दोघेही एकत्र बसलेले दिसून येतात. नवाज हिरव्या रंगाच्या शेरवानीत तर अवनीत गुलाबी रंगाच्या सूटमध्ये वधूच्या स्वरुपात दिसून येतेय.
एक निर्माती म्हणून स्वतःचा प्रवास सुरू करण्याच्या दिवशी पद्मश्री पुरस्कार प्राप्त करणे माझ्यासाठी अत्यंत विशेष आहे. तुम्हा सर्वांना मणिकर्णिका फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत स्वतःच्या प्रॉडक्शनच्या चित्रपटाचा पहिला लुक सादर करत आहे. टीकू वेड्स शेरु तुम्हा सर्वांना पसंत पडेल, लवकरच चित्रपटगृहांमध्ये भेटू असे कंगनाने कॅप्शनमध्ये म्हटले आहे.