ठाणे
कोरोना आपत्तीत ओढवलेल्या आर्थिक संकटातही चार टक्के वृद्धी करण्यात टीजेएसबी बँक यशस्वी झाली आहे. बँकेचा एकूण व्यवसाय 17 हजार कोटी रुपये इतका झाला आहे. बँकेच्या ठेवी अकरा हजार तीनशे चौऱयाहत्तर कोटी रुपयांवर पोहोचल्या आहेत. तसेच कर्ज व्यवहार पाच हजार सहाशे बेचाळीस कोटी रुपये झाला आहे. 2019-20 चा ताळेबंद घोषित करताना बँकेचे अध्यक्ष विवेकानंद पत्की यांनी ही माहिती दिली. बँकेने चालू वर्षी संतुलित वृद्धीवर भर दिला आहे. त्यामुळे स्वनिधीत त्र्याऐंशी कोटी रुपये इतकी घसघशीत वाढ झाली आहे. एकूण बँकिंग व्यवसायासमोर भांडवल उभारणीचे मोठे आव्हान असताना, टीजेएसबीने सातत्यपूर्ण नफ्याच्या बळावर सीआरएआरमध्ये 0.15 टक्के वाढ नोंदवली आहे. बँकेच्या भरीव स्वनिधीमुळे हे शक्मय झाले असून टीजेएसबीला वृद्धीसाठी भक्कम भांडवलाचे पाठबळ आहे, असे बँकेचे अध्यक्ष पत्की पुढे म्हणाले. यावेळी बँकेचे सभासद, ठेवीदार, हितचिंतक आणि बँकेचा अधिकारी-कर्मचारी वृंद यांच्या सहकार्याचे आणि सकारात्मकतेचे त्यांनी कौतुक केले.