ऑनलाईन टीम / मुंबई :
इंग्लंड दौऱ्यावर जाण्याआधी भारतीय संघातील खेळाडू कोरोना लसीचा पहिला डोस घेत आहेत. यामध्ये आता आणखी एक नाव जोडले गेले आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने याने आज (सोमवारी) कोरोना लसीचा पाहिला डोस घेतला आहे. याबाबत त्याने स्वतः सोशल मीडियावर माहिती दिली.
आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरील स्टोरीमध्ये फोटो शेअर त्याने सर्वांना यासंदर्भात माहिती दिली आहे. आपला कोरोनाची लस टोचून घेतनाचा फोटो टाकत त्याने लिहिले आहे, ‘जेवढ्या लवकर शक्य होईल, तेवढ्या लवकर कोरोनाची लस घ्या. सर्वांनी सुरक्षित राहा.’
कोहलीपुर्वी भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे, शिखर धवन, उमेश यादव, इशांत शर्मा अशा बऱ्याच सक्रिय भारतीय क्रिकेटपटूंनी कोरोनाची लस टोचून घेतली आहे. याशिवाय टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी देखील मार्च महिन्यात कोरोनाची लस घेतली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्माने कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी केट्टो संस्थेसोबत एक अभियान राबवत 2 कोटींची मदत केली होती. यासोबतच त्यांनी या अभियानाद्वारे एका आठवड्यात 7 कोटी जमा करण्याचे लक्ष्य ठेवले होते. त्यांच्या या अभियानाला लोक चांगला प्रतिसाद देत आहेत.