ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
भारतीय टीमच्या सुपरफॅन चारुलता पटेल यांचे निधन झाले. त्या 87 वर्षांच्या होत्या. या सुपरफॅन आजीचं निधन झाल्याची बातमी चारुलता यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्यांच्या नातीनं दिली. त्यावर लिहीले की, तुम्हांला कळवण्यास दुख होतं की, आमच्या आजीने 13 जानेवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजता अखेरचा श्वास घेतला.
इंग्लंडमध्ये 2019साली पार पडलेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाला उपांत्य फेरीत बाहेर पडावे लागले होते. मात्र वर्ल्ड कपची प्रबळ दावेदार म्हणून टीम इंडिया लंडनमध्ये दाखल झाली होती. भारतीय चाहते आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियमवर आवर्जुन उभे होते आणि याच चाहत्यांमध्ये 87 वषीय चारुलता पटेल यांचा समावेश होता.
दरम्यान, वर्ल्ड कप स्पर्धेतील बांगलादेशविरुद्धचा सामना पाहण्यासाठी चारुतला या स्टेडियमवर आल्या होत्या आणि त्यावेळी कर्णधार विराट कोहली, रोहीत शर्मा सह अन्य खेळाडूंनीही त्यांची भेट घेतली होती. त्यावेळी कोहलीनं चारुलता पटेल यांना पुढील सामन्याचं तिकीट देण्याचं कबुल केलं होतं आणि कोहलीनं शब्द पाळला. श्रीलंकेविरुद्धच्या लढतीचं तिकीट कोहलीनं आज्जीबाईंना दिलं. त्यामुळे पुन्हा एकदा त्याच उत्साहात आज्जीबाई टीम इंडियाला चिअर करण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचल्या होत्या. त्यांचं क्रिकेटप्रती प्रेम पाहून चाहतेच नव्हे तर विराट व रोहित शर्माही अवाक झाले होते.