या घडीला कंपनीचे 90 टक्के कर्मचारी वर्क फ्रॉम होम च्या आधारे कार्यरत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना विषाणूचा वाढत जाणारा विळखा आणि त्यामुळे देशातील लॉकडाऊनच्या कालावधीत दिवसेंदिवस होणारी वाढ यामुळे अनेक कंपन्या आपला व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी अन्य पर्यायी मार्गांचा वापर करत आहेत. यात वर्क फ्रॉम होम ही संकल्पना वेगाने समाजात रुजत असल्याचे पहावयास मिळते आहे. हा पर्याय निवडण्यात तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या पुढे आहेत तर अन्य कंपन्यांना या संकल्पनेचा वापर करण्यात अनेक अडचणी असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. सध्या देशातील प्रसिद्ध तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी टाटा कंसल्टन्सी(टीसीएस) चे 90 टक्के कर्मचारी वर्क फ्रॉम होम करत आहेत. ही संकल्पना पुढे चालू ठेवण्यासाठी येत्या 2025 पर्यंत कंपनीचे 75 टक्के कर्मचारी याच पद्धतीने कार्यरत राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
कोरोनाच्या विळख्यात आणि सरकारकडून पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार बंद आहेत. ही वस्तू स्थिती आहे परंतु या काळात 100 टक्के उत्पादकांसाठी 25 टक्के कर्मचारी कार्यालयातून काम करण्याची गरज असल्याचे टीसीएसचे मुख्य ऑपरेटिंग ऑफिसर एन. जी. सुब्ा्रम्हण्यम यांनी म्हटले आहे.
नवीन मॉडेलचा प्रारंभ
नवीन मॉडेलच्या आधारे आगामी काळात वर्क फ्रॉम होमची संकल्पना रुजण्याचे संकेत आहेत. यातून कमीत कमी कार्यालयास जागा लागणार आहे आणि अन्य गोष्टींमध्ये बदल होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. भारतात वर्क फ्रॉम होमच्या आधारे काम करणाऱयांची संख्या 3.5 लाख आहे आणि हा आकडा जागतिक नसल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे. यामुळे टीसीएस जागतिक पातळीवर यासंदर्भात प्रयत्न करणार असून 4.48 लाख कर्मचाऱयांसाठी नवीन मॉडेल सादर करणार आहे.