वृत्तसंस्था/ बेंगळूर
आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात टीसीएसने 6 महिन्यात दुसऱयांदा आपल्या कर्मचाऱयांच्या वेतनात वाढ करण्याचे ठरवले आहे. या वाढीचा कंपनीतील 4.7 लाख कर्मचाऱयांना फायदा होणार आहे. देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएसने पुढचे आर्थिक वर्ष 2021-22 साठी आपल्या कर्मचाऱयांचे वेतन वाढवण्याची घोषणा केली आहे. अशा प्रकारचा निर्णय घेणारी ही देशातील पहिलीवहिली आयटी कंपनी ठरली आहे. कर्मचाऱयांच्या वेतनात 6 ते 7 टक्के वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे. 6 महिन्यात दुसऱयांदा वेतनवाढीचा निर्णय घेतला आहे. एकंदर पाहता कर्मचाऱयांच्या वेतनात 10 ते 12 टक्के इतकी एकूण वाढ झालेली दिसणार आहे. मागच्या वर्षी ऑक्टोबर 2020 मध्ये आपल्या कर्मचाऱयांच्या वेतनात वाढ करण्याची घोषणा केली होती. चालू आर्थिक वर्षात तिसऱया तिमाहीत कंपनीचे प्रदर्शन चांगले राहिले आहे.