वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा वेगवान गोलंदाज टी. नटराजनच्या दुखापतग्रस्त गुडघ्यावर मंगळवारी डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली. डॉक्टरांच्या तज्ञ पथकाचे तसेच बीसीसीआयचे नटराजनने आभार मानले आहेत. या दुखापतीमुळे नटराजनला आयपीएल क्रिकेट स्पर्धेला मुकावे लागत आहे.
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत नटराजन सनरायजर्स हैद्राबाद संघाकडून खेळत होता. या वर्षी भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱयावेळी नटराजनला ही गुडघा दुखापत झाली होती. त्यानंतर त्याच्या या दुखापतीत सुधारणा झाल्याने त्याने आयपीएल स्पर्धेत हैद्राबाद संघाकडून दोन सामन्यात भाग घेतला होता पण त्यानंतर पुन्हा त्याला या वेदना सुरू झाल्याने शस्त्रक्रियेचा निर्णय तातडीने घेण्यात आला. आता नटराजनला काही दिवस विश्रांती घ्यावी लागणार आहे.