लंडन :
ऑलिम्पिकसारख्या अनेक क्रीडा प्रकारांचा समावेश असलेल्या जागतिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करायचा असल्यास टी-10 हा प्रकार योग्य ठरेल. टी-10 प्रकाराचा समावेश झाल्यास दहा दिवसांत ही स्पर्धा पूर्ण करता येणे शक्य आहे, असे मत इंग्लंडचा विश्वचषक विजेता कर्णधार इयॉन मॉर्गनने मांडले आहे.
यापूर्वी 1900 मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर 1998 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही त्याला स्थान देण्यात आले होते. पण इतर वेळी या जागतिक स्तरावरील स्पर्धांत या खेळाला स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे ठरावीक देश वगळता या खेळाचा इतर देशात विकास होऊ शकला नाही. 2022 मध्ये होणाऱया बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेत महिला टी-20 क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. पण टी-20, वनडे किंवा कसोटीपेक्षा टी-10 क्रिकेटचा समावेश जास्त योग्य आणि सोयीचा ठरू शकेल, असे मॉर्गनला वाटते. अबू धाबी लीगमध्ये तो दिल्ली बुल्स टी-10 संघाचा कर्णधार आहे.
आयपीएल ही त्यातील सर्वात लोकप्रिय आणि श्रीमंत स्पर्धा बनली आहे. टी-20 मध्ये 10 ते 20 ही षटके महत्त्वाची असतात. पण टी-10 मध्ये सुरुवातीची षटके जास्त महत्त्वाची ठरतात. कारण अतिशय छोटा पॉवरप्ले असल्याने त्याचा सर्वाधिक लाभ त्यावेळी घेण्याची गरज असते. त्यामुळे हा प्रकार जास्त आव्हानात्मक आहे, असे मला वाटते, असे मॉर्गनने स्पष्ट केले.