टोकियो ऑलिम्पिकसह युरो चषक, कोपा अमेरिका स्पर्धेचीही मेजवानी
नव्या उर्जेसह आगेकूच करण्यासाठी भारतीय क्रीडा वर्तुळ सज्ज
विवेक कुलकर्णी / बेळगाव
‘नवे वर्षही लवकर संपेल, कारण त्याच्या 2020 या आकडय़ातच ट्वेंटी-20 आहे’, अशा आशयाची पोस्ट समाजमाध्यमांवरुन मागील काही दिवसांपासून फिरते आहे. आता नवे वर्ष लवकर संपेलच, असेही नाही. पण, या वर्षात टोकियोच्या ऑलिम्पिकपासून फुटबॉलमधील युरो, कोपा अमेरिका चषक स्पर्धा, तसेच टेनिसमधील चारही ग्रँडस्लॅम स्पर्धांपर्यंत आणि तसेच महिलांच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेपासून आयपीएल ते ऑस्ट्रेलियातील टी-20 विश्वचषक स्पर्धेपर्यंत बरीच मेजवानी क्रिकेट वर्तुळाला लाभणार आहे.
पहिल्याच टप्प्यात जानेवारीत दक्षिण आफ्रिकेत 19 वर्षाखालील वयोगटात क्रिकेट विश्वचषक स्पर्धा होत असून त्यानंतर फेब्रुवारीत महिलांची टी-20 विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलियात रंगणार आहे. अवघ्या टी-20 क्रिकेट वर्तुळाचे लक्ष्य ज्यावर असते, ती आयपीएल स्पर्धा मार्च-एप्रिल महिन्यात होत असून पुढे बॅडमिंटन आशियाई चॅम्पियनशिप व काही ग्रँडस्लॅम स्पर्धा होतील.
त्यानंतर जुलैमध्ये जागतिक क्रीडा महोत्सव मानल्या जाणाऱया टोकियो ऑलिम्पिकचे बिगूल वाजणार असून ही स्पर्धा 24 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत होईल. ऑगस्टमध्ये बुद्धिबळाचे माहेरघर असलेल्या रशियात मॉस्को विश्व बुद्धिबळ ऑलिम्पियाड तर सप्टेंबरमध्ये झुरिच डायमंड लीग स्पर्धा होत आहे. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियन भूमीत टी-20 विश्वचषक स्पर्धेत कर्णधार विराट कोहली व मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या नेतृत्व गुणांचा खऱया अर्थाने कस लागेल. त्यानंतर शेवटच्या दोन महिन्यात डेव्हिस चषक व बॅडमिंटन वर्ल्ड टूरची फायनल होईल आणि या लागोपाठ स्पर्धांमुळे 2020 चे वर्ष कदाचित टी-20 च्या एखाद्या जलद, वेगवान सामन्याप्रमाणे लवकरात लवकर संपूनही जाईल!
प्रत्येक महिन्यातील महत्त्वाची एक स्पर्धा
जानेवारी : यू-19 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा (दक्षिण आफिका)
फेब्रुवारी : महिलांची टी-20 विश्वचषक स्पर्धा (ऑस्ट्रेलिया)
मार्च : आयपीएल (भारत)
एप्रिल : बॅडमिंटन आशियाई चॅम्पियनशिप (चीन)
मे : प्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धा (फ्रान्स)
जून : विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धा (इंग्लंड)
जुलै : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा (जपान)
ऑगस्ट : मॉस्को विश्व बुद्धिबळ ऑलिम्पियाड (रशिया)
सप्टेंबर : ऍथलेटिक्स डायमंड लीग, झुरिच (स्वित्झर्लंड)
ऑक्टोबर : टी-20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा (ऑस्ट्रेलिया)
नोव्हेंबर : टेनिस डेव्हिस चषक फायनल, माद्रिद (स्पेन)
डिसेंबर : बॅडमिंटन वर्ल्ड टूर फायनल्स (चीन).