वृत्तसंस्था / कँडी :
विंडीजचा अष्टपैलू किरॉन पोलार्ड क्रिकेटच्या टी-20 प्रकारात 500 सामने खेळणारा पहिला क्रिकेटपटू बनला असून त्याने दहा हजार धावांचा टप्पाही ओलांडला आहे. बुधवारी लंकेविरूद्ध येथे झालेल्या टी-20 सामन्यात विंडीजने लंकेचा 25 धावांनी पराभव केला. या सामन्यात पोलार्डने 15 चेंडूत 34 धावा जमविल्या.
टी-20 प्रकारात दहा हजार धावांचा टप्पा ओलांडणारा पोलार्ड हा दुसरा क्रिकेटपटू आहे. वेंडीजच्या ख्रिस गेलने टी-20 प्रकारात सर्वाधिक म्हणजे 13296 धावा जमविल्या आहेत. 2006 साली 32 वर्षीय पोलार्डने टी-20 प्रकारात येथील लीगमध्ये विविध प्रँचायजींचे प्रतिनिधित्व केले आहे.
बुधवारी झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना विंडीजने 20 षटकांत 4 बाद 196 धावा जमविल्या. त्यानंतर लंकेने 171 धावापर्यंत मजल मारली. विंडीजच्या थॉमसने या सामन्यात 5 गडी बाद केले. दोन सामन्यांच्या या मालिकेत विंडीजने 1-0 अशी आघाडी लंकेवर मिळविली आहे.