वृत्तसंस्था / दुबई
आयसीसीतर्फे जाहीर करण्यात आलेल्या टी-20 फलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत भारतीय सघाचा कर्णधार विराट कोहली आणि सलामीचा फलंदाज के.एल. राहुल यांनी आपले स्थान स्थिर राखले आहे. या यादीत कोहली पाचव्या तर राहुल सातव्या स्थानावर आहेत. मात्र पाकच्या मोहम्मद रिझवानने पहिल्यादांच मानांकनातील पहिल्या 10 फलंदाजांमध्ये स्थान मिळविले आहे.
पाकचा यष्टीरक्षक आणि फलंदाज 28 वर्षीय मोहम्मद रिझवानने अलिकडेच झालेल्या टी-20 मालिकेतील पहिल्या आणि तिसऱया सामन्यात अनुक्रमे नाबाद 82 आणि नाबाद 91 धावा जमविल्याने त्याने ताज्या मानांकन यादीत दहाव्या स्थानावर झेप घेतली आहे. यापूर्वी रिझवान या यादीत 15 व्या स्थानावर होता. या ताज्या मानांकन यादीत इंग्लंडचा डेव्हिड मॅलेन 892 गुणांसह पहिल्या, ऑस्ट्रेलियाचा फिंच 830 गुणांसह दुसऱया, पाकचा कर्णधार बाबर आझम तिसऱया स्थानावर आहेत. टी-20 च्या गोलंदाज आणि अष्टपैलूंच्या मानांकन यादीत पहिल्या 10 खेळाडूमध्ये भारताच्या एकाही क्रिकेटपटूचा समावेश नाही.
कसोटी क्रिकेटच्या फलंदाजांच्या मानांकनात न्यूझीलंडचा केन विलीयमसन पहिल्या स्थानावर आहे तर कसोटी गोलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स पहिल्या स्थानावर असून कसोटी अष्टपैलूंच्या यादीत रविंद्र जडेजा तिसऱया स्थानावर आहे.