वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसीतर्फे सोमवारी घोषित करण्यात आलेल्या टी-20 सांघिक ताज्या मानांकनामध्ये भारताने अग्रस्थानावर झेप घेतली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मायदेशात विंडीजविरूद्धची टी-20 मालिका 3-0 अशी एकतर्फी जिंकल्याने या ताज्या मानांकन यादीत त्यांनी अग्रस्थान मिळविले आहे.
रविवारी कोलकाता येथे भारतीय संघाने तिसऱया आणि शेवटच्या सामन्यात विंडीजचा 17 धावांनी पराभव करून ही मालिका एकतर्फी जिंकत विंडीचा व्हाईटवॉश केला. टी-20 सांघिक मानांकनात यापूर्वी इंग्लंड पहिल्या स्थानावर होता पण भारताने इंग्लंडला पहिल्या स्थानावरून खाली खेचले आहे. या ताज्या मानांकनात भारत 269 गुणांसह पहिल्या तर इंग्लंडने 269 गुणांसह दुसरे स्थान मिळविले आहे. भारताने 10,484 तर इंग्लंडने 10,474 गुण नोंदविले आहेत. पाकचा संघ 266 मानांकन गुणांसह तिसऱया, न्यूझीलंड 255 गुणांसह चौथ्या, दक्षिण आफ्रिका 253 गुणांसह पाचव्या आणि ऑस्ट्रेलिया 249 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियन संघाने अलिकडेच लंकेविरूद्धची टी-20 मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली होती.