वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसी टी-20 महिलांच्या ताज्या मानांकन यादीत भारताच्या शेफाली वर्माने पुन्हा अग्रस्थान पटकाविले आहे. 17 वर्षीय शेफाली वर्माची सध्या सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिकाविरूद्धच्या टी-20 मालिकेतील कामगिरी चांगली झाल्याने तिने पुन्हा पहिले स्थान मिळविले आहे.
गेल्यावर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत शेफाली वर्माच्या शानदार कामगिरीमुळे भारतीय संघाने बाद फेरीत प्रवेश मिळविला होता. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत दक्षिण आफ्रिकेने भारतावर 2-0 अशी आघाडी मिळविली आहे. टी-20 फलंदाजांच्या मानांकन यादीत दक्षिण आफ्रिकेची ली 11 व्या स्थानावर आहे. भारताची दिप्ती शर्मा 40 व्या स्थानावर आहे.
महिलांच्या वनडे फलंदाजांच्या मानांकन यादीत दक्षिण आफ्रिकेच्या ली ने आपले अग्रस्थान गमविले असून आता इंग्लंडची बेमाँट पहिल्या स्थानावर आहे. भारताची मिताली राज आठव्या स्थानावर आहे. महिलांच्या सांघिक वनडे मानांकनात दक्षिण आफ्रिका दुसऱया स्थानावर असून भारत चौथ्या स्थानावर आहे.