वेलिंग्टन / वृत्तसंस्था
कर्णधार ऍरॉन फिंचने अवघ्या 55 चेंडूत नाबाद 79 धावांची आतषबाजी केल्यानंतर ऑस्ट्रेलियाने येथील चौथ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडचा 50 धावांनी फडशा पाडला आणि 5 सामन्यांची ही मालिका 2-2 अशी बरोबरीत आणली. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 6 बाद 156 धावा केल्या तर प्रत्युत्तरात यजमान न्यूझीलंडचा डाव 18.5 षटकात अवघ्या 106 धावांमध्येच गुंडाळला गेला. उभय संघातील पाचवी व निर्णायक लढत उद्या (रविवार दि. 7) भारतीय प्रमाणवेळेनुसार, पहाटे 4.30 वाजता खेळवली जाणार आहे.
फिंचने जेमिसनच्या डावातील शेवटच्या षटकात 4 षटकारांसह तब्बल 26 धावांची आतषबाजी केली आणि यामुळे ऑस्ट्रेलियाला 150 धावांचा टप्पा सहज सर करता आला. ऑस्ट्रेलियातर्फे टी-20 मध्ये 100 षटकार नोंदवणारा पहिला फलंदाज होण्याचा मान मिळविला असून शंभरहून अधिक षटकार नोंदवणारा तो जगातील सहावा फलंदाज बनला आहे. किवीज संघातर्फे ईश सोधीने 32 धावात 3 बळी घेतले. प्रत्युत्तरात न्यूझीलंडच्या एकाही फलंदाजाला फटकेबाजी करता आली नाही. काईल जेमिसनने सर्वाधिक 30 धावा जमवल्या. ऑस्ट्रेलियातर्फे केन रिचर्डसनने 19 धावात 3 तर ऍगर, झाम्पा, मॅक्सवेल यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया ः 20 षटकात 6-156 (ऍरॉन फिंच 55 चेंडूत 5 चौकार, 4 षटकारांसह नाबाद 79, स्टोईनिस 19. सोधी 3-32, ट्रेंट बोल्ट 2-27).
न्यूझीलंड ः 18.5 षटकात सर्वबाद 106 (काईल जेमिसन 18 चेंडूत 30, टीम सीफर्ट 28 चेंडूत 19, डेव्हॉन कॉनवे 17. केन रिचर्डसन 3-19, ऍस्टॉन ऍगर, ऍडम झाम्पा, ग्लेन मॅक्सवेल प्रत्येकी 2 बळी).