वृत्तसंस्था/ मिरपूर
शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान बांगलादेशने अफगाणचा 62 धावांनी पराभव करत विजयी सलामी दिली. या सामन्यात बांगलादेशने 20 षटकात 8 बाद 155 धावा जमविल्यानंतर अफगाणचा डाव 17.4 षटकात 94 धावांत आटोपला.
बांगलादेशच्या डावामध्ये लिटॉन दासने 44 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह 60, सलामीच्या एम. शहरीयारने 18 चेंडूत 3 चौकारांसह 17, शकीब अल हसनने 5, कर्णधार मेहमुदुल्लाने 10 तसेच अकिब हुसेनने 24 चेंडूत 2 चौकारांसह 25 धावा जमविल्या. बांगलादेशच्या डावामध्ये 3 षटकार आणि 11 चौकार नोंदविले गेले. अफगाणतर्फे फरुकी आणि अमातुल्ला ओमझाय यांनी प्रत्येकी 2 तर रशिद खान, कयास अहमद यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना अफगाणचा डाव 17.4 षटकात 94 धावांत आटोपला. अफगाण संघातील केवळ 3 फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली. एन. झेदरानने 26 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 27, कर्णधार नबीने 19 चेंडूत 2 चौकारांसह 16 तर ओमझायने 18 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 20 धावा जमविल्या. अफगाणच्या डावात 2 षटकार आणि 7 चौकार नोंदविले गेले. बांगलादेशतर्फे नेसुम अहमदने 10 धावांत 4 तर शकीब अल हसनने 18 धावांत 2, एस. इस्लामने 29 धावांत 3 आणि रेहमानने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
बांगलादेश- 20 षटकात 8 बाद 155 (लिटॉन दास 60, अतीफ हुसेन 25, एम. शहरीयार 17, फरुकी 2-27, ओमझाय 2-31), अफगाण- 17.4 षटकात सर्वबाद 94 (एन. झेदरान 27, नबी 16, ओमझाय 20, नेसुम अहमद 4-10, एस. इस्लाम 3-20, शकीब अल हसन 2-18, रेहमान 1-19).