वृत्तसंस्था/ काबुल
संयुक्त अरब अमिरातमध्ये होणाऱया आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी अफगाणच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या क्रिकेट सल्लागारपदी झिम्बाब्वेचा माजी कर्णधार तसेच इंग्लंड संघाचा माजी प्रशिक्षक अँडी फ्लॉवरची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती अफगाण क्रिकेट मंडळाच्या प्रवक्त्याने दिली.
2009 ते 2014 सालापर्यंत इंग्लंड क्रिकेट संघाला अँडी फ्लॉवरचे मार्गदर्शन लाभले होते. 2010 आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंड संघाला अजिंक्यपदक मिळवून देण्यामध्ये फ्लॉवर यांचे योगदान महत्त्वाचे ठरले होते.
अँडी फ्लॉवरने आपल्या क्रिकेट कारकीर्दीत 63 कसोटी आणि 213 वनडे सामन्यांत झिम्बाब्वेचे प्रतिनिधीत्व केले. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर फ्लॉवरने आपल्या प्रशिक्षक कारकीर्दीला प्रारंभ केला. इंग्लंड संघाला तसेच आयपीएल, सीपीएल, पीएसएल आणि द हंड्रेड या स्पर्धेत खेळणाऱया विविध संघांना त्यांचे मार्गदर्शन लाभले आहे. मोहम्मद नबीच्या नेतृत्वाखाली अफगाणचा क्रिकेट संघ गेल्या बुधवारी काबुल येथून कतारमध्ये दाखल झाला आहे.