किवीजने कोरोनावर नियंत्रण मिळविल्याने ऑस्ट्रेलियाच्या डीन जोन्स यांनी सुचविला पर्याय
वृत्तसंस्था/ सिडनी
न्यूझीलंडने कोव्हिड 19 महामारीवर नियंत्रण मिळविले असून तेथील परिस्थिती सर्वसामान्य होत असल्याने टी-20 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन न्यूझीलंडमध्ये पेले जाऊ शकते, असा विचार ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज व टीव्ही समालोचक डीन जोन्स यांनी मांडला आहे. ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ही स्पर्धा होणार असून महामारीमुळे त्यावर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले असल्याने त्यांनी हा पर्याय सुचविला आहे.
मागील बारा दिवसांत न्यूझीलंडमध्ये कोरोनाची लागण झालेला एकही नवा रुग्ण सापडलेला नाही. सध्या त्यांच्याकडे फक्त एक पॉझिटिव्ह रुग्ण आहे. कोरोनाविरुद्धच्या लढय़ासाठी सज्ज करण्यात आलेली यंत्रणा ऍलर्ट लेव्हल 1 वर आणण्याची गरज आहे का, याचा आढावा घेण्यासाठी येत्या सोमवारी न्यूझीलंड कॅबिनेटची बैठक होणार आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विविध निर्बंध घालण्यात आले होते. हे निर्बंध हटविण्याचा निर्णय झाल्यास मोठे सामूहिक कार्यक्रम करण्यास परवानगी मिळणार आहे. कोरोनाने जगभरात आतापर्यंत पावणेचार लाख बळी घेतले आहेत.
ऍलर्ट लेव्हल 1 पुढील आठवडय़ात लागू केले जाण्याची अपेक्षा आहे. मात्र पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी झाली तरच हा निर्णय घेतला जाईल, असे न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डेम यांनी सांगितले. ‘ऍलर्ट लेव्हल 1 लागू केल्यास सोशल डिस्टन्सिंग व मोठी गर्दी असलेल्या कार्यक्रमावरील निर्बंध हटविले जातील, असे आर्डेम यांनी म्हटले आहे. असे झाले तर टी-20 विश्वचषक स्पर्धा तेथे खेळविली जाऊ शकते, असा विचार मनात आला,’ असे डीन जोन्स यांनी आपल्या विधानाचे स्पष्टीकरण दिले. विश्वचषक स्पर्धा 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या अवधीत होण्याचे ठरले आहे. मात्र कोरोना महामारीमुळे त्याच्या आयोजनावर अनिश्चितता निर्माण झाली आहे. आयसीसीने यावर अद्याप निर्णय घेतलेला नसून 10 जून रोजी होणाऱया बैठकीत ते निर्णय घेण्याची शक्यता आहे.
यावर्षी ऑस्ट्रेलियात ही स्पर्धा आयोजित करण्याची शक्यता जोन्स यांनी याआधीच फेटाळून लावली आहे. ‘अनेक कारणांसाठी ही स्पर्धा ऑस्ट्रेलियात होऊ शकणार नाही,’ असे त्यांनी एका वाहिनीशी बोलताना म्हटले होते. टी-20 विश्वचषक स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय झाल्यास बीसीसीआयला आयपीएल स्पर्धा भरविण्याची संधी मिळणार आहे आणि याची योजना आधीपासूनच तयार होत असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.