वृत्तसंस्था/ दुबई
17 ऑक्टोबरपासून आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला मस्कतमध्ये प्रारंभ होणार आहे. सदर स्पर्धा संयुक्त अरब अमिरातमधील विविध शहरामध्ये घेतली जाणार आहे. या स्पर्धेसाठी स्टेडियमच्या क्षमतेनुसार 70 टक्के प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार असल्याचे आयसीसीच्या प्रवक्त्याने सांगितले. या स्पर्धेसाठी अरब अमिरातमधील सर्व क्रिकेट स्टेडियम्स सुसज्ज करण्यात आली आहेत.
या स्पर्धेत 16 संघांचा समावेश आहे. क्रिकेट शौकिनांना किमान तिकीट दरामध्ये सामना पाहता यावा यासाठी तिकीट विक्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. 14 नोव्हेंबर रोजी या स्पर्धेचा समारोप होणार आहे. अबु धाबीतील एका आधुनिक सुसज्ज क्रिकेट स्टेडियममध्ये कोरोना संदर्भातील नियमांची अंमलबजावणी करताना प्रेक्षकामध्ये सोशल डिस्टन्स ‘पॉड्स’ची सोय करण्यात आली आहे. या स्टेडियममधील पूर्व आणि पश्चिमेच्या बाजुला कमाल चार पेक्षकांसाठी पॉड्सची सोय करण्यात आली आहे. ओमान क्रिकेट अकादमीतर्फे तीन हजार शौकिनांच्या स्वागतासाठी हंगामी स्वरूपाचे बांधकाम केले जाणार आहे.
आयसीसीच्या पुरूषांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी येणाऱया क्रिकेट शौकिनांना आनंद लुटण्यासाठी ओमान आणि संयुक्त अरब अमिरात शौकिनांचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. या स्पर्धेसाठी अमिरात क्रिकेट मंडळाने बीसीसीआयचे आभार मानले आहेत. ओमान आणि संयुक्त अरब अमिरातमध्ये जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंचे या स्पर्धेसाठी आगमन होणार आहे. ही स्पर्धा अमिरात क्रिकेट मंडळ मोठय़ा प्रमाणात यशस्वी करेल, असा विश्वास बीसीसीआयचे सरचिटणीस जय शहा यांनी व्यक्त केला आहे. या स्पर्धेवेळी सामन्यांच्या ठिकाणी कोरोना संदर्भातील नियमांची अंमलबजावणी कठोरपणे केली जाईल. या स्पर्धेत 24 ऑक्टोबर रोजी होणारा भारत आणि पाक यांच्यातील सामना प्रमुख आकर्षण ठरणार आहे.