बीसीसीआय एका महिन्याची मुदत मागणार, फ्यूचर्स टूर प्रोगॅमबद्दल चर्चा अपेक्षित
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतातील कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर, आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेबद्दल विचारविनिमय करण्यासाठी आयसीसीची आज (मंगळवार दि. 1) व्हर्च्युअल बैठक होत असून त्यात बीसीसीआय अंतिम निर्णय घेण्यापूर्वी एक महिन्याची मुदत द्यावी, अशा आशयाची विनंती करेल, असे संकेत आहेत.
बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली या बैठकीला प्रत्यक्ष हजर राहतील, असे यापूर्वी सांगण्यात आले होते. मात्र, गांगुली यांनी यासाठी दुबईला जाणे टाळले असून ते आता या बैठकीला ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत. यानंतर बुधवारी ते संयुक्त अरब अमिरातीला रवाना होणार असून तेथे ते अमिरात क्रिकेट मंडळाच्या पदाधिकाऱयांशी संवाद साधतील.
आयपीएलचा उर्वरित टप्पा संयुक्त अरब अमिरातला हलवणे भाग पडल्यानंतर आता आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद हातातून जाऊ नये, यासाठी बीसीसीआय सध्या प्रयत्नशील आहे. याचाच भाग म्हणून एका महिन्याची मुदत मागून घेण्याचा त्यांचा विचार आहे.
‘सध्या देशात कोरोनाचे नवे रुग्ण कमी होत आहेत. पण, तरी देखील सध्या देशात आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा भरवण्यासारखी परिस्थिती नाही. त्यामुळे, एका महिन्याचा अवधी मागून घेण्याची अध्यक्ष सौरभ गांगुली, सचिव जय शाह यांची भूमिका योग्य आहे’, असे बीसीसीआयमधील एका सूत्राने गोपनियतेच्या अटीवर नमूद केले.
‘सध्याचे चित्र पाहता, ऑक्टोबर-नोव्हेंबरमधील ही स्पर्धा भारतात होण्याची शक्यता 50-50 इतकी आहे. याप्रमाणे मुंबईतील 3 मैदाने, पुणे व अहमदाबाद या ठिकाणी स्पर्धेतील सामने होऊ शकतात. यामुळे, संघांना फारसा प्रवास करावा लागणार नाही. मात्र, पाकिस्तानचे सामने महाराष्ट्रात होण्यासंबंधी काही मुद्दे असू शकतात आणि मुळात, बीसीसीआयला केंद्राची यासाठी रीतसर परवानगी घ्यावी लागेल’, असे या सूत्राने पुढे नमूद केले.
कर प्रणालीचा मुद्दा
आयसीसीला टी-20 विश्वचषक स्पर्धेतून मिळणाऱया उत्पन्नावर करामध्ये सवलत मिळावी, अशी अपेक्षा आहे. मात्र, प्रशासन यासाठी अनुकूल नसल्याचे चित्र आहे. यावर या बैठकीत चर्चा होणे अपेक्षित आहे. जर यासाठी बीसीसीआय प्रशासनाचे मन वळवू शकले नाही तर त्यांना 905 कोटी रुपयांचा कर आपण भरण्याची तयारी ठेवायला हवी, असाही मतप्रवाह आहे.
एफटीपीमध्ये बदल शक्य 2023 ते 2031 पर्यंतच्या फ्यूचर्स टूर्स व प्रोग्रॅम सायकलबद्दल या बैठकीत चर्चा केली जाणार असून त्यात आयसीसी इव्हेंटवर भर दिला जाणे अपेक्षित आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपवर यंदा कोरोनाचा बराच विपरीत परिणाम दिसून आला असून त्यामुळे, पुढील वर्षातील या स्पर्धेबद्दल विचारविनिमय होणे अपेक्षित आहे.