फक्र झमान, सर्फराज अहमदला डच्चू, आझमकडे नेतृत्व
वृत्तसंस्था/ कराची
आयसीसीच्या होणाऱया आगामी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी 15 जणांचा पाकचा संघ जाहीर करण्यात आला. या संघात असिफ अली आणि खुशदील शहा यांचे पुनरागमन झाले असून फक्र झमान आणि यष्टीरक्षक सर्फराज अहमद यांना वगळण्यात आले आहे. पाक संघाचे नेतृत्व बाबर आझमकडे सोपविण्यात आले असून शदाब खान उपकर्णधार आहे.
आयसीसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 17 ऑक्टोबरपासून संयुक्त अरब अमिरात आणि ओमान येथे खेळविली जाणार आहे. या स्पर्धेपूर्वी बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकचा संघ न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिका खेळणार आहे. या मालिकेतील 7 सामने लाहोर आणि रावळपिंडी येथे 25 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबरपर्यंत होत आहेत. या मालिकेनंतर पाकचा संघ दुबईत आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सलामीचा सामना भारताबरोबर खेळणार आहे. आगामी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या 15 जणांच्या पाक संघामध्ये 5 फलंदाज, 2 यष्टीरक्षक आणि फलंदाज, 4 अष्टपैलू तसेच 4 वेगवान गोलंदाजांचा समावेश आहे. फक्र झमान, कादीर तसेच शहनवाज दहानी यांची राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली.
पाक संघ- बाबर आझम (कर्णधार), शदाब खान (उपकर्णधार), असिफ अली, आझम खान, हॅरीस रॉफ, हसन अली, इमाद वासीम, खुशदील शहा, मोहम्मद हाफीज, मोहम्मद हेसनेन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वासीम ज्युनियर, शाहीन आफ्रिदी, शोएब मक्सूद.