वृत्तसंस्था / कोलंबो
ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान संयुक्त अरब अमिरात आणि ओमान येथे होणाऱया आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी रविवारी लंकन क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली. या स्पर्धेसाठी लंकन संघात 21 वर्षीय फिरकी गोलंदाज महीश थीक्षणाचा समावेश करण्यात आला आहे.
गेल्या आठवडय़ात दक्षिण आफ्रिका संघाविरूद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताना महीश थीक्षणाने 4 बळी मिळविले होते. लंकन निवड समितीने त्याला या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी संधी दिली आहे. तसेच डावखुरा फिरकी गोलंदाज प्रवीण जयविक्रमाचाही संघात समावेश करण्यात आला आहे. दुखापतीनंतर कुसल परेराचे संघात पुनरागमन झाले आहे. दसून शनाकाकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. आयसीसीच्या या स्पर्धेत लंकन संघाचा अ गटात समावेश असून आयर्लंड आणि हॉलंड यांचाही या गटात सहभाग आहे. लंकेचा या स्पर्धेतील सलामीचा सामना 18 ऑक्टोबरला नामीबियाबरोबर अबु धाबीत होणार आहे.
लंका संघ- दसुन शनाका (कर्णधार), धनंजय डिसिल्वा, कुसल परेरा, दिनेश चंडीमल, अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षे, सी. असालंका, हसरंगा, के. मेंडीस, चमिका करूणारत्ने, प्रदीप, चमिरा, जयविक्रमा, मधुशंका, महीश थीक्षणा, राखीव- एल. कुमारा, बी. फर्नांडो, अकिला धनंजय आणि पुलिना थरंगा.