‘ट्विटर स्टॉर्म’ निर्माण करण्याचा उद्देश- दिल्ली पोलिसांची माहिती
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
टूलकिट प्रकरणी दिल्ली पोलिसांकडून तपासाची सूत्रे अधिक वेगाने फिरवली जात आहेत. दिशा रवी, निकिता जेकब व शंतनू यांनी टूलकिट तयार केले आणि एडिट करण्यासाठी ते इतरांना शेअर केल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. तसेच, दिशा रवीच्या मोबाईलमधूनच ठोस पुरावे मिळाले आहेत, अशी देखील माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. दरम्यान, पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱया 21 वर्षीय दिशा रवीच्या अटकेनंतर, सामाजिक कार्यकर्त्या आणि वकील निकिता जेकब यांच्याविरोधात अजामिनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे.
प्रजासत्ताक दिनी ‘ट्विटर स्टॉर्म’ निर्माण करण्याचा आरोपींचा उद्देश होता. जानेवारीत टूलकिट बनवण्यात आले जेणेकरून आंदोलन अधिक वाढेल. ते परदेशात पोहचवता येईल व परदेशातील भारतीय दूतावासांना लक्ष्य केले जाईल, असा उद्देश संबंधितांनी ठेवला असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. दिल्ली पोलिसांच्या सुत्रांच्या हवाल्याने यासंबंधी माहिती समोर आली आहे. टूलकिट प्रकरणात पोएटीक जस्टिस फाउंडेशनचा देखील सहभाग असल्याचा संशय आहे.
दिल्ली पोलिसांच्या मते 11 जानेवारी रोजी ऑनलाईन ‘झूम’ बैठक आयोजित करण्यात आली होती. या झूम बैठकीमध्ये निकिता, शंतनू आणि दिशा रवी यांच्यासह जवळपास 60 ते 70 जण सहभागी झाले होते. 26 जानेवारी रोजी ट्विटर स्टॉर्म निर्माण करण्याचे नियोजन या सर्वांनी केले होते. ग्रेटा थनबर्ग टूलकिट केसमध्ये दिल्ली पोलीस पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवीच्या निकवर्तीयांचा शोध घेत आहेत.
दिशाने टेलिग्रामद्वारे ग्रेटापर्यंत पोहोचवले टूलकिट
3 फेब्रुवारीला ग्रेटा थनबर्गने दोन सोशल मीडिया पोस्ट लिहिल्या होत्या. पहिल्या पोस्टमध्ये तिने शेतकऱयांचे समर्थन केले होते. दुसऱया पोस्टमध्ये एक टूलकिट शेअर केली होती. ही टूलकिट एक गूगल डॉक्यूमेंट होती. त्यानंतर काही माहिती टेलिग्रामच्या माध्यमातूनही शेअर झाल्याचे दिसत आहे. या प्रकरणात दिशा रवीवर टूलकिट संपादित केल्याचा आरोप आहे. शेतकरी आंदोलनाविषयी ग्रेटाने शेअर केलेली टुलकिट दिशानेच संपादित आणि व्हायरल केली होती. यासाठी तिने व्हॉट्सऍप ग्रुपही बनवला होता. दिशाने हे टूलकिट टेलिग्राम ऍपच्या माध्यमातून ग्रेटापर्यंत पोहोचवले होते. सदर टुलकिट व्हायरल झाल्यानंतर दिशाने ग्रेटाला हे टूलकिट हटवण्यास सांगितले होते. नंतर दिशाने टूलकिटसाठी बनवलेला व्हॉट्सऍप ग्रुपही डिलिट केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. कॅनडामधील रहिवासी असलेल्या पुनीत नावाच्या एका महिलेने दिशा, निकिता आणि शंतनू यांना या संघटनेशी जोडल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलचे सहआयुक्त प्रेम नाथ यांनी दिली आहे.
पाकिस्तानकडून दिशा रवीचे समर्थन
गेले अडीच महिन्यांपासून शेतकऱयांचे केंद्रीय कृषी कायद्याविरोधात आंदोलन सुरू असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने केलेल्या ट्विटर टूलकिट प्रकरणी देशात दिशा रवीला अटक करण्यात आल्यानंतर या वादात पाकिस्तानने आता उडी घेतली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाने ट्विट करत दिशा रवीला पाठिंबा दर्शवला आहे. मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार भारतात त्यांच्याविरोधात गेलेल्या प्रत्येकाला गप्प करण्यावर विश्वास ठेवते. यासाठी क्रिकेटपटू आणि बॉलिवूडमधील दिग्गजांचा उपयोग करून घेणे लज्जास्पद होते. पण, आता त्यांनी टूलकिट प्रकरणात दिशा रवीला अटक केल्याचे ट्विटमध्ये म्हटले आहे.