वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कोरोना महामारीच्या काळात देशवासीयांमध्ये भ्रम फैलावणे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिमा मलीन करण्याचा आरोप काँग्रेसवर भाजपने मंगळवारी केला आहे. या संकटकाळात विरोधी पक्षाचे ‘गिधाडीवृत्तीचे राजकारण’ समोर आले आहे. कोरोनाकाळात पूर्ण देश महामारीशी लढत असताना काँग्रेसने स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी भारताला जगभरात ‘अपमानित आणि बदनाम’ करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी एका ‘टूलकिट’चा दाखला देत केला आहे.
‘टूलकिट’ एकप्रकारचा दस्तऐवज असून यात स्वतःच्या मोहिमेला पुढे नेण्यासाठी नियोजनबद्ध मुद्दे मांडलेले असतात. स्वतःच्या मोहिमेला धार देण्यासाठी याच मुद्दय़ांवर विरोधकांना घेरण्यासाठी प्रचार-प्रचार केला जातो. अलिकडेच शेतकरी आंदोलनाच्या दरम्यान देखील एक टूलकिट समोर आले होते.
काँग्रेसने महामारीच्या काळात अशाच ‘टूलकिट’द्वारे सरकारची कोंडी करण्यासाठी विविध माध्यमांमधून देशात भ्रामक स्थिती निर्माण करून राजकीय लाभ मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. राहुल गांधींनी महामारीचा पंतप्रधान मोदींची प्रतिमा मलीन करण्याची संधी म्हणून वापर केला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांना कोरोनाच्या नव्या स्ट्रेनला मोदी स्ट्रेन नाव देण्याचा निर्देश देण्यात आला. विदेशी पत्रकारांच्या मदतीने भारताला बदनाम करण्याची कुठलीच संधी सोडण्यात आली नसल्याचा दावा पात्रा यांनी केला आहे.
कोरोनाच्या नव्या स्ट्रेनला डब्ल्यूएचओने देखील भारतीय स्ट्रेन म्हणण्यास नकार दिला आहे, पण काँग्रेस याला ‘इंडियन स्ट्रेन’ आणि त्यापुढे जात ‘मोदी स्ट्रेन’ नावाने संबोधित आहे. हा प्रकार अत्यंत दुःखद आहे. देशाला जगभरात अपमानित आणि बदनाम करण्यासाठी एका विषाणूला भारताचे नाव, पंतप्रधानांच्या नावावर संबोधिण्याचा हा किळसवाणा प्रकार आहे. काँग्रेस पक्षाची खरी वृत्ती यातून दिसून येत असल्याचे पात्रा म्हणाले.
ज्या दस्तऐवजाच्या मदतीने राहुल गांधी दररोज सकाळी उठून ट्विट करायचे तो आज आमच्या हाती लागला आहे. या टूलकिटमध्ये पंतप्रधान मोदींविषयी वारंवार लिहा असे म्हटले गेले आहे. कधी सोनिया गांधी तर कधी अन्य कुणी पत्र लिहित आहे. हे सर्व प्रकार असेच घडत नसून एका डिझाइन अंतर्गत हे होत असून याचा तपशील या टूलकिटमध्ये असल्याचे भाजप प्रवक्त्याने म्हटले आहे.
या टूलकिटद्वारेच पीएम केयर्सच्या व्हेंटिलेटर्सवर प्रश्न उपस्थित करणे आणि सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाला ‘मोदींचे वैयक्तिक घर आणि महाला’च्या स्वरुपात प्रचारित करण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. कुंभला सुपरस्प्रेडरच्या स्वरुपात मांडण्याची बाबही यात सामील आहे. ईद आणि कुंभची तुलना करून धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला आहे. कुंभला बदनाम करा आणि ईदविषयी काहीच बोलू नका अशाप्रकारची मानसिकता मारक असल्याचे उद्गार पात्रा यांनी काढले आहेत.
एफआयआर नोंदविणार ः काँग्रेस
भाजपच्या या आरोपावर काँग्रेसने संताप व्यक्त करत प्रत्युत्तर दिले आहे. भाजपने ‘बनावट टूलकिट’ प्रदर्शित केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते राजीव गौडा यांनी केला आहे. तसेच त्यांनी भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा आणि प्रवक्ते संबित पात्रा यांच्याविरोधात ‘बनावटगिरी’प्रकरणी एफआयआर नोंदविणार असल्याचे म्हटले आहे. भाजप कोविडच्या गैरव्यवस्थापनावर टूलकिटचा दुष्प्रचार करत आहे. तसेच याला काँग्रेसशी जोडत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.