वृत्तसंस्था/ रायपूर
टूलकिट प्रकरणावरून वाद वाढला आहे. छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री डॉ. रमण सिंग यांनी सोमवारी स्वतःच्या समर्थकांसह पोलीस स्थानकाबाहेर धरणे आंदोलन केले आहे. डॉ. रमण यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष विष्णुदेव साय, विरोधी पक्षनेते धरमलाल कौशिक, आमदार बृजमोहन अग्रवाल यांच्यासह अन्य भाजप नेत्यांनी या आंदोलनात भाग घेतला आहे.
टूलकिटप्रकरणी एनएसयुएआय प्रदेशाध्यक्ष आकाश शर्मा यांच्या तक्रारीवर पोलिसांनी रमण सिंग यांच्यासह भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांच्याविरोधात गुन्हे नोंदविले हेते. पोलिसांनी रमण सिंग तसेच पात्रा यांना नोटीस बजावली होती. पात्रा यांच्या वकिलाने ईमेलच्या माध्यमातून नोटीसला उत्तर विधान नोंदविण्यासाठी रायपूर पोलिसांकडून मुदत मागितली आहे.
काँग्रेसने एका टूलकिटच्या मदतीने पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारला लक्ष्य करण्याचा प्रयत्न चालविल्याचा आरोप भाजप प्रवक्ते पात्रा यांनी केला होता. तर काँग्रेसने संबंधित टूलकिट दस्तऐवज बनावट असल्याचा दावा केला होता. या टूलकिटवरून दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले होते.