चिपळूण
चिपळूणच्या दिशेने येणाऱया मळीच्या टँकरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो कुंभार्ली घाटात सुमारे 250 खोल दरीत कोसळल्याची घटना शनिवारी रात्री 11.30 च्या सुमारास घडली. तब्बल 7 तास पोलिसांसह स्थानिकांच्या मदतीने चाललेल्या रेस्क्यू ऑपरेशनद्वारे अखेर चालकाला बाहेर काढण्यात यश आले. सुदैवानेच तो वाचला असून अधिक उपचारासाठी त्यास कराडला नेण्यात आले.
राजेंद्र तावसा बनसोडे (सांगली) असे जखमी झालेल्या चालकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री 11.30च्या सुमारास कुंभार्ली घाटमार्गे सांगली ते तालुक्यातील खडपोली असा बनसोडे हे मळीचा टँकर घेऊन येत होते. भरधाव वेगात असलेला टँकर सोनपात्राखाली एका मोठय़ा वळणावर आला असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो 250 फूट खोल कुंभार्ली घाटातील दरीत कोसळला. या अपघातात बनसोडे दरीत दूरवर फेकले गेले.
या अपघाताची माहिती अलोरे-शिरगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाल्यानंतर ते आपल्या कर्मचाऱयांसह घटनास्थळी दाखल झाले. तसेच स्थानिकांना या घटनेची माहिती मिळताच ते ही मदतीला धावले. चालकाला बाहेर काढण्यासाठी पोलिसांसह स्थानिकांनी बचावकार्य सुरु केले. मात्र अंधार असल्यामुळे मदतकार्यात अडचणी येत होत्या. सुरुवातीला पोलीस व काही ग्रामस्थांनी दरीत उतरून शोध सुरु केला. मात्र दूरवर फेकल्या गेलेल्या चालक बनसोडे यांचा काही वेळाने दरीतून ओरडण्याचा आवाज येऊ लागला.
बचावकार्याला उजाडली पहाट
याचदरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी व तहसीलदार जयराज सूर्यवंशी हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बलून लाईट आणल्यामुळे अखेर चालकाचा शोध लागला. चालकाला बाहेर काढण्यात आल्यानंतर तो गंभीर जखमी असल्याने त्यास कराडला नेण्यात आले. शनिवारी रात्री 11.30च्या सुमारास सुरु केलेले हे बचावकार्य रविवारी पहाटे 5च्या सुमारास संपले. या मदतकार्यात पोलिसांसह पंचायत समिती सदस्य बाबू साळवी, कासम खान, प्रमोद डांगरे, कौस्तुभ मालवदे, सल्लाव सय्यद, मानसिग पवार, बावा होडे, जमीर सय्यद, शिवा बडदे, समीर घाणेकर, मंदार शेलार, अमोल सावंत आदी सहभागी होते.